
सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीने लग्नासाठी मुलाच्या घरी येऊन आई-वडिलांना शिवीगाळ केली. तुमच्या मुलाचे माझ्याशी लग्न करून न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही तिने दिली. मुलीच्या या कृत्यामुळे मुलाच्या घरच्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कुणाल श्रेणिक शाह (वय 25, रा. स्वीट कॉर्नरसमोर, आगरकरमळा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी कुणाल सराफ व्यावसायिक आहेत. इन्स्टाग्रामवर सुमारे आठ महिन्यांपूर्वी त्याची भिंगार परिसरातील एका तरुणीशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने मुलीला प्रेमदान चौकातील एका कॅफेमध्ये भेटण्यास बोलावले. त्यावेळेस त्या मुलीने लग्न करण्याची मागणी घातली. कुणालने लग्न करण्यास नकार दिल्यावर तरुणीने भिंगार पोलीस ठाणे आणि न्यायालयात अत्याचाराची तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी कुणालचा जबाब नोंदविलेला आहे.
संबंधित तरुणी गुरुवारी कुणालच्या घरी आली. तिने हातामध्ये ब्लेड आणले होते. ‘माझे कुणालबरोबर लग्न लावून द्या, नाहीतर मी जीवाचे बरे-वाईट करून घेईन’, अशी धमकी देत ती कुणालच्या घरावर चढली. कुणालच्या आईने तिला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तिने मारहाण केली तसेच वडिलांनाही शिवीगाळ केली. लग्न लावून न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुलीला कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले.



























































