पंढरीची वारी यंदा थेट तुमच्या घरी! 23 जूनपासून स्टार प्रवाहवर ‘माऊली महाराष्ट्राची’, आदेश बांदेकर करणार सूत्रसंचालन

पंढरीच्या भक्ती प्रवाहाची वारी, यंदा थेट तुमच्या घरी येणार आहे. निमित्त आहे ते ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमाचे. स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 23 जूनपासून दररोज सायंकाळी 6 वाजता हा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अभिनेते आदेश बांदेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून

ते स्वतः वारीत सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने वारीचा हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या अनुभवता येणार आहे. आषाढी एकादशीचे औचित्य साधून डोक्यावर तुळस, गळय़ात तुळशीच्या माळा, कपाळी बुक्का, खांद्यावर पताका आणि टाळ-मृदंगाच्या तालावर ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’चा जयघोष करत राज्याच्या कानाकोपऱ्यातून पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. डोळय़ांचे पारणे फेडणारा हा सोहळा ‘याचि देहि, याचि डोळा’ अनुभवण्याची सर्वांची इच्छा असते. पण प्रत्येकालाच ते शक्य होते असे नाही. अशा प्रेक्षकांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने घरबसल्या वारीचा अनुभव घेता येणार आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने या कार्यक्रमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला असून आतापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.