
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘हा घ्या, माझा आधार कार्डचा नंबर’. चला, कोणीही त्याचा दुरुपयोग करून दाखवाच!’ असे शनिवारी दिलेले आव्हान टेलिकॉम रेग्लुलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय)चे चेअरमन आर. एस. शर्मा यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. त्यांनी ‘ट्विटर’वरून आपला आधार कार्ड नंबर जाहीर करताच काही ट्विटर युजर्सनी त्यांची ‘कुंडली’च सोशल मीडियावर जाहीर करून टाकली.
शर्मा यांनी जाहीर केलेल्या त्यांच्या आधार कार्डच्या नंबरवरून अनेकांनी त्यांची सारी माहिती खणून काढली. त्यातून त्यांचा मोबाईल नंबर, घरचा पत्ता, जन्मतारीख, फोटो अशी बरीच खासगी माहिती बऱ्याच ट्विटर युजर्सनी मिळवली. त्यातील काहींनी तर सोशल मीडियावरून अशी आत्मघातकी आव्हाने देत बसू नका, असे ‘ट्राय’च्या चेअरमनना सुनावले आहे. शर्मा हे ‘युनिक आयडेण्टिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’चे माजी संचालक आहेत. ‘आधार कार्ड’ पद्धतीचे ते समर्थक असून ती सिस्टीम निर्धोक असल्याच्या दाव्यावर ते ठाम आहेत.
मात्र एका ट्विटर युजरने मी तुमच्या आधार कार्डच्या नंबरचा दुरुपयोग करून दाखवतो. मला कायदेशीर कारवाईपासून अभय मिळेल काय, अशी विचारणाही शर्मा यांना केली आहे. त्यावर शर्मा यांनी आपण कोणतीही कारवाई करणार नाही, असा ‘शब्द’ त्याला दिला आहे. नरेंद्र मोदीजी, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याचा नंबर तुम्हीही जाहीर करा, असे आव्हान फ्रान्सचे सुरक्षा तज्ञ इलियट एल्डरसन यांनी आज दिले. त्यांनीच आधार कार्डाच्या नंबरवरून ‘ट्राय’च्या चेअरमनची खासगी माहिती बाहेर काढली आहे.
माझे आव्हान खासगी माहिती हस्तगत करून दाखवण्याचे नव्हतेच. माझे नुकसान करून दाखवा, असे माझे आव्हान आहे. त्यावर मी अजूनही ठाम आहे.
– आर. एस. शर्मा, चेअरमन, ‘ट्राय’



























































