
पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी न जोडल्यास तुमचे पॅनकार्ड 1 ऑक्टोबरपासून ‘इन-ऑपरेटिव्ह’ (निक्रिय) ठरणार आहे.
पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह म्हणजे जोपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक करीत नाही तोपर्यंत ते वापरता येणार नाही. मात्र केंद्र सरकारने इन-ऑपरेटिव्ह म्हणजे नेमके काय हे स्पष्ट केलेले नाही. जुलै 2019 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन-आधार लिंक करण्याच्या नियमांत बदल केले होते.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 31 मार्च रोजी पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यापूर्वीही पॅन क्रमांक दिलेल्या मुदतीत आधार क्रमांकाशी लिंक केला नाही तर पॅनकार्ड इनव्हॅलीड मानले जाईल, असा नियम होता.पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह झाल्यास पॅनकार्ड आवश्यक असलेल्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करता येणार नाही. म्हणजेच अर्थकरदाते पॅनकार्डचा वापर करू शकणार नाहीत.





















































