
राज्यातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राज्यातील सुजाण नागरीक आणि खासकरून महिला वर्ग प्रचंड नाराज झाला आहे. युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत घडलेला प्रकार हा गलिच्छ प्रकार असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे हे संभाजीनगर दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले की, ‘माझ्या, शिवसेनेच्या किंवा महा विकास आघाडीच्या भूमिकेपेक्षा सगळं लक्ष लागलंय ते राज्याच्या मंत्रिमंडळावर. ते पदमुक्त करणार का ? हा पहिला प्रसंग नाहीये. टीईटी घोटाळा समोर आलेला आहे. स्वत:च्या मतदारसंघात ते कुठेही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले नाहीयेत. काल महिलेला त्यांनी शिवीगाळ केली. हा गलिच्छ प्रकार आहे. त्यांच्या मनात काय आहे ते लोकांसमोर आलं आहे.’
‘या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून काहीही अपेक्षा नाहीये, त्यामुळे उपमुख्यमंत्री काही जबाबदारी घेणार आहेत का ? राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करते याकडेही लक्ष लागलेले आहे. नुसत्या राजकीय नोटीसा पाठवून चालणार नाही. महिला सुरक्षा महत्त्वाची असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
गद्दारांचे सरकार पडणार, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक उद्योग पळवले जात आहेत. शेतकरी, महिला तरुणांच्या व्यथा ऐकायला कोणी तयार नाही. खरा मुख्यमंत्री कोण, उद्योगमंत्री, कृषिमंत्री कोण हेच राज्यातील जनतेला आज ठाऊक नाही. त्यामुळे खंजीर खुपसून गुवाहाटीला पळालेल्या गद्दारांचं हे घटनाबाह्य सरकार काही महिन्यांत कोसळणार म्हणजे कोसळणारच, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सोमवारी व्यक्त केला. शेतकरी संवादयात्रेच्या पहिल्याच दिवशी विदर्भ आणि मराठवाडा ढवळून काढताना आदित्य ठाकरे यांनी अकोला, बुलढाणा व संभाजीनगर जिह्यांत झंझावाती दौरा केला. बाळापूर, मेहकर येथे तर रणरणत्या उन्हात आणि रात्री सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांच्या तुफानी सभा झाल्या. ‘हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरे जा. मीही राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामे द्या आणि निवडून येऊन दाखवा’, असा तडाखा आदित्य ठाकरे यांनी गद्दारांना लगावला.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांना अद्याप कोणतीही मदत सरकारकडून मिळालेली नाही. राज्यभरातील या शेतकऱयांच्या बांधावर जाऊन शेतकऱयांना आदित्य ठाकरे धीर देत आहेत. शेतकऱयांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचे आश्वस्त करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या ‘शेतकरी संवादयात्रे’ची आज सोमवारी अकोल्यातून सुरुवात झाली. अकोला, बुलढाणा आणि संभाजीनगर जिह्यांतील शेतकऱयांच्या बांधावर जाऊन आदित्य ठाकरे यांनी शेतकऱयांशी संवाद साधला. बाळापूर येथे रणरणत्या उन्हात प्रचंड संख्येने थांबलेल्या शेतकऱयांशी बोलताना त्यांनी मिंधे सरकारवर हल्लाबोल केला.
मी देतो, तुम्हीही राजीनामा द्या
राज्यातील जनतेला, शेतकऱयांना उघडय़ावर सोडणाऱया सरकारचा निषेध करत सरकार म्हणून ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. तसेच तुम्हाला जनतेने गद्दार म्हणून नाही, राज्यकर्ते म्हणून स्वीकारले असेल तर तुम्हाला चॅलेंज देतो, मी राजीनामा देतो, तुम्ही 40 जण राजीनामा देऊन निवडणुका घ्या, बघूयात जनतेचा कौल काय आहे, असे थेट आव्हान त्यांनी गद्दार आमदारांना दिले.
निष्ठेशी नातं जपलं, अकोल्यातील चहा सेंटरला भेट
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोल्यातील निष्ठावान शिवसैनिक मुरली सुर्वे यांच्या प्रसिद्ध मुरली टी सेंटरला भेट देऊन शिवसेनेप्रति असलेल्या निष्ठेचा सन्मान केला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा अकोला दौऱयावर यायचे, तेव्हा ते या टी सेंटरला भेट द्यायचे, अशी आठवणही आदित्य ठाकरे यांनी इथे सांगितली. या भेटीनिमित्ताने शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्यामधील भावनिक नात्याची पुन्हा प्रचिती आल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर केले आहे.
श्री राजराजेश्वर मंदिरात घेतले दर्शन
आदित्य ठाकरे यांनी अकोल्याचे ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, वरुण सरदेसाई, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर यांची उपस्थिती होती.
गद्दारांनी 50 खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला
आदित्य ठाकरे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत राज्य सरकार आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीकेची तोफ डागली. राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान केले. सर्वत्र ओला दुष्काळाची मागणी होत असताना कृषिमंत्री ओला दुष्काळ नाहीच आहे असं म्हणत आहेत. या गद्दारांनी पन्नास खोके घेऊन स्वतःचा दुष्काळ संपवला, पण यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
तुमच्या डोळय़ातील अश्रू दिसताहेत
इथे सर्व शेतकरी बांधव आहेत. मला शेतीतले फारसे कळत नाही. मात्र, तुमचा त्रास कळतोय. तुमच्या डोळ्यातले अश्रू दिसतायत. अतिवृष्टी दोन-तीन वेळा झाली. अजून सर्व्हे झाला नाही, पंचनामा झाला नाही, नुकसानभरपाई झाली नाही. आमचे सरकार असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता.
आमदार देशमुखांना आलिंगन
व्यासपीठावर येताच आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा आगळावेगळा सन्मान केला. ते म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱयाच्या बांधावर जात असलो, तरी आज ही सभा नितीनजींसाठी आहे, आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते लढताहेत. ज्यांनी स्वतःला विकले नाही, मानसन्मान विकला नाही, अशा व्यक्तीला मिठी मारायला आलोय. हे प्रेम आणि हा विश्वास असतो, असे म्हणत त्यांनी आमदार नितीन देशमुख यांना मिठी मारत त्यांचे अभिनंदन केले. योगायोगाने डावीकडे आणि उजवीकडे निष्ठावान शिवसैनिक आहेत, आदर्श शिवसैनिक आहेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी बनत असताना, भाजपसोबत युती मोडत असताना, उद्धव साहेबांचा फोन यायच्या आधी प्रधानमंत्री कार्यालयात पदाचा राजीनामा देऊन मुंबईकडे निघालेले खासदार अरविंद सावंत यांचेदेखील त्यांनी कौतुक केले.
अब्दुल गद्दार
तुमच्याकडे अतिवृष्टी झाली का?, अतिवृष्टीने नुकसान झाले का? कृषीमंत्री बांधावर आले का अशी विचारणा करीत कृषीमंत्री माहिती आहे का? असे विचारताच गर्दीतून ‘अब्दुल गद्दार’ असे उत्तर आले. आज या महाशयाने सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी अत्यंत घाणेरडा व गलिच्छ शब्द वापरला. महिलांचा अनादर, अपमान करणारे लोक हवेत का? असे मंत्री तुम्हाला चालणार का? असे म्हणताच सभेतून ‘नाही…. नाही..’ असा बुलंद प्रतिसाद मिळाला.
विदर्भ, मराठवाडय़ात झंझावात
बाळापूर येथे शेतकरी संवाद कार्यक्रमात मोरगाव येथील माणिकराव चेडाळणे, अर्जुन लाखे व अन्य कापूस उत्पादक शेतकऱयांनी वऱहाडातील प्रमुख पीक असलेल्या कापसाच्या बोंडापासून बनवलेला हार घालून शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनीही या शेतकऱयांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.




























































