राज्याला जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटनाला प्राधान्य देणार!

642

राज्याला जागतिक पातळीवर न्यायचे असेल तर प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटनाची खासीयत जगासमोर आणणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटनाला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सरकार संभाजीनगर मनपासोबत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि आणि उद्योग, खनिकर्म, मराठी भाषामंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज गुरुवारी संभाजीनगरात बैठक घेऊन पर्यटन आणि पर्यावरणा संदर्भात आढावा घेतला. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत आहे. आजच्या बैठकीत पर्यटनवाढीसाठी काय करता येईल, यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. आतापर्यंत एक-दोन जिल्ह्यांतच पर्यटनाला चालना मिळत होती. मात्र, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटनाला पुढे आणले जाणार आहे. राज्यातील पर्यटन जागतिक पातळीवर न्यायचे असेल तर प्रत्येक जिल्ह्यातील पर्यटनाला पुढे आणणे गरजेचे असल्याने ते काम आता केले जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

नगरसेवक आमदार, खासदार यांच्यामार्पâत होणारी कामे ही जनतेची कामे असतात. त्यांची कामे करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार खंबीरपणे मनपासोबत असल्याचेही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रदूषणाचे निकष न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्यानुसार निकष न पाळणाऱ्यांना सूट दिली जाणार नाही. मात्र, रोजगार निर्मिती करणे आणि प्रदूषण न करणे याची सांगड घालावी लागेल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या