
निशिकांत दुबे यांची मानसिकता ही भाजपची मानसिकता आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच निशिकांत दुबेंसारख्या फडतूस लोकांकडे लक्ष देऊ नका असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
मराठी लोक उत्तर भारतीयांच्या पैश्यांवर जगतात अशा शब्दात भाजप खासदार निशिकांत दुबे बरळले होते. आदित्य ठाकरे यांनी आज दुबे यांचा चांगला समाचार घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक लोक आनंदाने राहतात, चांगला व्यवसाय करतात निशिकांत दुबेंसारख्या फडतूस माणसाला महाराष्ट्रात आग लावायाची आहे, महाराष्ट्र पेटवायचा आहे आणि स्वतःची पोळी भाजायची आहे. फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात त्यांना अशी आग लावायची आहे,. भाजपच्या नेत्यांना देशात नुसत्या आगी लावायच्या आहेत आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत. निशिकांत दुबे यांची मानसिकता ही भाजपची मानसिकता आहे, उत्तर भारत असा नाहिये. महाराष्ट्रात संपूर्ण देशातून लोक एक स्वप्न घेऊन येतात. फोडा आणि राज्य करा ही भाजपची निती आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच आमची लढाई ही सरकारविरोधात होती, भाषेच्या सक्तीविरोधात होती. कुठल्याही भाषेविरोधात आमची लढाई नव्हती. निशिकांत दुबे हे संपूर्ण उत्तर भारते प्रतिनिधित्व नाही करत. इथे आनंद दुबे आहेत ते शिवसैनिक आहेत आणि महाराष्ट्रात काम करत आहेत. निशिकांत दुबे सारख्या आग लावणाऱ्या लोकांकडे लक्ष नाही दिले तर त्यांचे राजकारण चालणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.