
निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले महाराष्ट्रातील सरकार अल्पावधीतच बिल्डर-कंत्राटदारांचे सरकार झाले आहे, असा हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. पुण्यातील लोकमान्यनगर पुनर्विकास प्रकल्पाला थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या स्थगितीचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याबाबत आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली आहे. पुण्यातल्या लोकमान्यनगरचे उदाहरण देत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘पुण्यातल्या लोकमान्यनगरच्या पुनर्विकासाचा मार्ग स्थानिक रहिवाशांनी निवडला असताना आणि त्यांना तो विकास हवा असतानाही, अचानक स्थानिक आमदाराच्या पत्रावर थेट मुख्यमंत्री कार्यालयाने या पुनर्विकासाला स्थगिती दिली. झटक्यात असे करण्याचे कारण काय होते?’ असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, आता क्लस्टर विकासाच्या नावाखाली ही जागा सत्ताधाऱ्यांच्याच जवळच्या एका बिल्डरच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरू झालाय का? स्थानिकांचे काय म्हणणे आहे, हे ऐकून न घेता जर मुख्यमंत्री हा निर्णय घेत असतील, तर सरकार नेमकं कोणाचं आहे, असा सवाल उपस्थित केला.




























































