जनतेचा विश्वास हेच आमचे सौभाग्य – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

जन आशीर्वाद यात्रा तुमच्या मनातील दुःख, वेदना जाणून घेण्यासाठी आहे. राजकीय पक्षाला, नेत्यांना लोकं निवेदने देतात, कारण त्यांचा विश्वास असतो. मला मिळणारी निवेदने ही तुम्ही दाखविलेला विश्वास असून, जनतेचा विश्वास हे माझे सौभाग्य असल्याचे भावोद्गार शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे भरपावसातही आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या स्वागतासाठी शिवसैनिक व नागरिकांनी मोठी तुंडूब गर्दी केली होती. सभास्थळी आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच ढोल ताशाच्या गजराने व जय भवानी, जय शिवाजी, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा विजय असो, अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. व्यासपीठावर आल्यावर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे यांनी शाल व विठ्ठल रुक्माईची प्रतिमा देवून युवासेनाप्रमुखांचे स्वागत केले.

‘तुम्ही लांब आहात, मग मी व्यासपीठावर कसा राहू, मी देखील तुमच्यात येतो, असे म्हणत आदित्य ठाकरे हे व्यासपीठाखाली आले. जनतेत उभे राहून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत तुम्ही भरघोस मतांनी हिंगोलीची जागा शिवसेनेच्या पारड्यात टाकली व भगवा फडकवला म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे. ही राजकीय यात्रा किंवा प्रचार फेरी नाही, शिवसेना ही एक चळवळ असून, लोकांचा पक्ष आहे. शिवसेनेची शाखा 365 दिवस 24 तास चालू राहते. शेतकऱ्यांसोबत उभा असलेला एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना आहे. प्रत्येक अडचणीला शिवसेना धावून जात आहे. शिवसेना दुष्काळाच्यावेळी मदतीला धावून आली आहे. कुठे पशूखाद्य, कुठे पाण्याच्या टाक्या, धान्य वाटप तर सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले आहेत. जन आशीर्वाद यात्रेसोबत पाऊस देखील घेवून आलो आहे. हा पाऊस पुढे विदर्भातही जाईल. बळीराजाला बळ कसे देता येईल, सुख कसे देता येईल याचा जाणिवेतून आम्ही काम करीत आहोत. जनतेचा विश्वास आणि त्यांच्याकडून मिळणारी जबाबदारी हे सौभाग्य असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त माझ्यात आहे, म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपवता आहात, असेही त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे यांची वृक्षतुला
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख यांचे वसमत येथे ओमगार्डन परिसरामध्ये कार्यक्रमस्थळी आगमन होताच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार, तालुकाप्रमुख अंकुश आहेर यांनी स्वागत केले. त्यानंतर वड, पिंपळ, बदाम, सिताफळ, जांभुळ, चिंच या वृक्षांची रोपे ठेवून आदित्य ठाकरे यांची वृक्षतुला करण्यात आली.

यावेळी यांची प्रमुख उपस्थिती
शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, पशूसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, लोकसभा संपर्वâप्रमुख आनंदराव जाधव, माविमच्या अध्यक्षा तथा महिला आघाडीच्या संपर्क संघटक ज्योती ठाकरे, युवासेना सचिव वरण सरदेसाई, उपनेते लक्ष्मणराव वडले, प्रियंका चतुर्वेदी, माजीमंत्री सचिन अहिर, जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ.जयप्रकाश मुंदडा, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, उपजिल्हाप्रमुख सुनील काळे, जिल्हा युवाधिकारी बाजीराव सवंडकर, दिलीप घुगे, आमदार सुभाष साबणे, युवासेना विस्तारक अमित गिते, जिल्हा समन्वयक दिलीप बांगर आदींची उपस्थिती होती.

ताफा थांबला….जाणून घेतल्या व्यथा
सकाळपासून संततधार पाऊस असून देखील आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेची उत्सुकता शिवसैनिक व नागरिकांना लागली होती. नांदेड तालुक्यातील मालेगाव येथे भरपावसात शंभरच्यावर नागरिकांचा जनसमुदाय आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी उभा होता. वसमत येथून विजय संकल्प मेळावा आटोपून अर्धापूरकडे जातांना पावसात नागरिक वाट पाहत असल्याचे बघून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रवास करत असलेले वाहन थांबवले, यावेळी वाहनांचा ताफाही थांबला. पावसात उभ्या असलेल्या नागरिकांच्या जवळ येत आदित्य ठाकरे यांनी या प्रेमळ स्वागताचा स्वीकार केला. तसेच शेतकरी व नागरिकांसोबत सद्यस्थितीवर चर्चा केली.

महिलांनी सांगितल्या अडचणी
हिंगोली-परभणीहून वसमतकडे येत असताना आदित्य ठाकरे यांनी झिरोफाटा ते सातेफळच्या दरम्यान पंधरा ते वीस नागरिक जन आशीर्वाद यात्रेची प्रतिक्षा करीत असल्याचे पाहून त्यांची भेट घेतली. भर पावसात आदित्य ठाकरे यांनी भेट दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पीकविमा व कर्जमुक्तीच्या संबंधी अडचणी सांगितल्या. वसमत शहरातील आसेगाव टी पॉइंटच्या जवळ महिलांनी उत्स्पूâर्तपणे आदित्य ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी दोन महिलांनी त्यांना नगरपालिकेच्या कामासंबंधीची अडचण सांगितली. पती नगरपालिकेच्या सेवेत होते, त्यांच्यानंतर नगरपालिकेने कुणाला सेवेत घेतले नाही, पेन्शन संबंधी अडचण असल्याचे त्यांना सांगितले.