पालिका मुख्यालयात शिवसेना कार्यालयाची दिमाखदार वास्तू! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशस्त सभागृह, सुसज्ज बैठक व्यवस्था, मोकळी हवा, महापौरांसह माजी महापौर, लोकप्रतिनिधींसाठी दालने, नागरिकांसाठी सुविधा आणि आकर्षक रचना असलेल्या पालिका मुख्यालयातील शिवसेना कार्यालयाच्या दिमाखदार वास्तूचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. 97 नगरसेवकांसह पालिकेतील सर्वात मोठा आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या  शिवसेनेच्या या नव्या वास्तूचा उद्घाटन सोहळा म्हणजे ‘सुवर्ण दिवस’च असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. मुंबईकरांनी गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेला दिलेली साथ आणि आशीर्वाद यामुळेच हे शक्य झाले असून यापुढेही पालिकेवर भगवा असाच फडकत राहील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पालिका मुख्यालय मुख्य हेरिटेज इमारतीच्या तळमजल्यावर नवीन शिवसेना कार्यालय तयार करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यालयाचा रुबाब आणखी वाढला आहे. कार्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा आहे. तर भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमा आहेत. त्यामुळे कार्यालयाला आणखी वैभव प्राप्त झाले आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याही प्रतिमा आहेत. अशा दिमाखदार वास्तूचे उद्घाटन शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल, स्थापत्य समिती अध्यक्ष (शहर) दत्ता पोंगडे, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्नील टेंबवलकर, राजराजेश्वरी रेडकर, प्रतिमा खोपडे, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, नगरसेवक श्रद्धा जाधव, विश्वनाथ महाडेश्वर, चंद्रशेखर वायंगणकर, सुजाता पाटेकर, सुजाता सानप, अरविंद भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

लोकांचे जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य!

गेल्या एक वर्षाहून जास्त काळ पालिका कोरोनाविरोधात लढत आहे. याला नागरिकांचेही सहकार्य मिळाल्याने कोरोना आता आटोक्यातही आला आहे, मात्र अजून पूर्ण संकट टळलेले नाही. मुंबईत अजूनही दररोज 500 हून जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे काळजी घेऊनच आणि टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करावे लागतील. आरोग्यतज्ञांनी तिसऱया लाटेचा धोकाही दिला आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याबाबतच विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. कारण लोकांचे जीव वाचवणे हे पहिले कर्तव्य आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

‘नॉन कोविड’ कामे लवकरच सुरू होतील!

कोरोना असताना रस्ते, पुलांसह अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी कामे सुरू राहिली. त्यामुळे कोरोना लढय़ाचे सुप्रीम कोर्टासह पंतप्रधानांनाही पालिका, महापौर, आयुक्तांचे कौतुक केले आहे. आता कोरोना पूर्ण नियंत्रणात आलाय. त्यामुळे तिसरी लाट येऊच नये, अशी भावना व्यक्त करीत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ‘नॉन कोविड’ कामेही लवकरच सुरू होतील, असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.