
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील चाळी आणि शिवडी बीडीडी चाळीचाही वरळी आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या धर्तीवर पुनर्विकास होणार आहे. दिल्ली दौऱयावर असलेले शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पेंद्रीय बंदर विकासमंत्री सर्वानंद सोनवाल यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी विनंती केली. सोनवाल यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून याबाबत माहिती दिली. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्यासोबत आज पेंद्रीय मंत्री सोनवाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत मुंबईतील दोन महत्त्वाचे विषय मांडले.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि वडाळा येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास होत आहे. त्याप्रमाणे मुंबई ट्रस्टच्या जागेवरील शिवडी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात येणाऱया अडचणी दूर कराव्यात अशी विनंती पेंद्रीय मंत्री सोनवाल यांनी मान्य केल्याचे आदित्य ठाकरे यांनी यात नमूद केले आहे. शिवडी बीडीडी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळींचा पुनर्विकास करून पेंद्र सरकार म्हाडाप्रमाणे उत्पन्नही मिळवू शकते असेही त्यांनी सोनवाल यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिल्याचे म्हटले आहे.
ससून डॉकमधील मच्छीमार बांधवांचाही त्रास दूर होणार
मुंबई बंदर प्राधिकरण (एनपीए) आणि महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ (एनएफडीसी) यांच्यात ससून डॉकमधील जागेच्या भाडय़ाबाबत मतभेद आहेत. त्याचा नाहक त्रास तेथील मच्छीमार बांधवांना होत आहे. मच्छीमार बांधवांना त्यांच्याच जमिनीवरून बेदखल करण्याची धमकी दिली जात आहे. त्याप्रश्नी आपण गांभीर्याने लक्ष घालावे आणि संबंधितांना सूचना द्याव्यात असे आपण सोनवाल यांना सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.