महिला सुरक्षेपासून मैदाने, तलावांच्या सुशोभीकरणातून मुंबईचे रूप बदलणार; आदित्य ठाकरे यांचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईमध्ये सोयीसुविधा निर्माण करताना त्यामध्ये नीटनेटकेपणा आणून मुंबईचे वेगळे-चांगले रूप निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्टचे बसस्टॉप आकर्षक पारदर्शक करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. मैदाने, उद्याने, तलावांचे सुशोभीकरण, किल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.

राज्याचे पर्यटन, पर्यावरणमंत्री व मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई उपनगर जिल्हा वार्षिक योजना आराखडय़ातील कामांचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएच्या सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या  2021-22 च्या आराखडय़ातील कामांचा आढावा घेण्यात आला.

2021-22 च्या आराखडय़ानुसार उपनगर जिह्यात सुविधांच्या निर्मितीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिह्याच्या विकासाला गती देण्यात येईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ही कामे नियोजित वेळेत तसेच दर्जेदार करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

मुंबई उपनगर जिह्यासाठी 2021-22 मध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 440 कोटी रु., अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 51 कोटी रु. तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांसाठी 5.59 कोटी रु. असा एकूण 496 कोटी 59 लाख रुपयांच्या आराखडा मंजूर केला आहे.

या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबईतील खासदार, आमदार, नगरसेवक, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.

ट्रॉम्बे येथील जेट्टीचा विकास

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बोगद्याजवळील झोपडय़ा हटवून तेथे हँगिंग गार्डनसारखे गार्डन तयार होऊ शकेल, तसेच ट्रॉम्बे येथील जेट्टीचा विकास करता येईल, अशी सूचना अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केली. खार येथे आयटीआयशेजारील जागेचा काwशल्य विकासच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत विकास करू, असेही ते म्हणाले.

वाहतूक समस्या सोडवण्यासाठी

मुंबईतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विविध ठिकाणी पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सिग्नल यंत्रणेमध्ये सुसूत्रता आणून ते आकर्षक बनविले जात आहेत. खेळण्यासाठी मैदाने, रेल्वे स्थानकांबाहेरील रहदारीमध्ये सुधारणा, पावसाच्या पाण्यापासून किंवा दरड कोसळण्यापासून संरक्षणासाठी बांधलेल्या भिंती सुस्थितीत राखणे, त्या परिसरातील रहिवाशांना इतरत्र स्थलांतरित करणे, चौपाटय़ांचे सौंदर्यीकरण करणे, किल्ल्यांची योग्य निगा राखणे, कांदळवनाचे संवर्धन करणे त्याचबरोबर कचऱयाचे विलगीकरण करून योग्य व्यवस्थापन करणे आदी बाबीही प्राधान्याने केल्या जाणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.