इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्या! पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी ‘इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी’ आणून राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांनी जास्तीत-जास्त इलेक्ट्रिक वाहने घ्यावीत, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज चिंचवड एमआयडीसी येथील कायनेटीक ग्रीन एनर्जी अॅण्ड पॉवर सोल्युशन लिमिटेड पंपनी आणि पिंपरी येथील टाटा मोटर्स कंपनीस भेट देत पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, उत्पादन कालावधी, चार्जिंग कालावधी आदींची माहिती जाणून घेतली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ग्रीन एनर्जी अॅण्ड पॉवर सोल्युशन लिमिटेड कंपनी आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, कायनेटिक कंपनीचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, कार्यकारी संचालक अजिंक्य फिरोदिया, सुलज्जा फिरोदिया आदी उपस्थित होते.

मुंबई, पुण्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर काळाची गरज

दोन्ही कंपन्यांतील वाहन निर्मितीबाबत समाधान व्यक्त करून आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई, पुणे यांसारख्या महानगरात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. लांब आणि जवळच्या पल्याचे अंतर लक्षात घेऊन आसन क्षमतेची व्यवस्था करण्याची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱया कंपन्यांना राज्य शासन प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी नमूद केले.