कोस्टल रोड, मेट्रोच्या कामांमुळे पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या! पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा तोंडावर असून मान्सूनपूर्व कामांची तातडीने पूर्तता करा. पायाभूत कामे सुरू असून येथील राडारोडा तिथून हलविण्याची तत्काळ कार्यवाही करा. कोस्टल रोड किंवा मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिल्या.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. विशेषतः तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा आढावा घेतला. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, शहरामध्ये मान्सूनपूर्व कामांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. त्याचप्रमाणे  कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरात पुरेशा आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे, आयसीयू बेड्स, ऑक्सिजन बेड्स याबरोबरच पेडियाट्रिक ट्रीटमेंट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनाविषयक मदतीसाठी शहरात प्रत्येक वॉर्डाकरिता सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकांना त्या त्या भागात व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज रहा – अस्लम शेख

मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यावेळी म्हणाले की, तौकते वादळामुळे शहरातील मच्छिमारांच्या बोटींच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात त्यांना मदत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व पातळ्यांवर सुसज्जता करावी. शहरात सध्या लसीकरण सुरू असून लसीकरण केंद्रांवर कार्यालय किंवा इतर कोणत्याही प्रकारचे इतर उपक्रम सुरू ठेवू नयेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विविध झोनचे उपायुक्त, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.