15 आमदार शिवसेनेच्या संपर्कात; आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतून काही आमदारांना जबरदस्ती गुवाहाटीला नेले आहे. पण हृदयाने-मनाने जे आपल्यात आहेत त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. 15 बंडखोर आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केला.

शिवसेना विभागप्रमुख व आमदार संजय पोतनीस यांनी वाकोला येथे शिवसेना विभाग क्रमांक सहामधील शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला शिवसैनिक व महिला शिवसैनिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन होताच सभागृहात चैतन्य निर्माण झाले. शिवसैनिकांनी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणा दिल्या.

‘त्यांच्या’साठी दरवाजे खुले

ज्यांना तिथे जायचे आहे जावे, जे शिवसेनेचे नव्हते त्यांना शिवसेना नव्हे तर महाराष्ट्राचे दरवाजे बंद आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. बंडखोर विरोधी बाकांवरच एखादे बंड विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षाकडे होते, पण सत्ताधारी पक्षातून विरोधकांमध्ये जाण्यासाठी झालेले हे एकमेव बंड आहे. पण त्यांना विरोधी बाकांवरच बसावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले

तुमची लायकी आहे का?

बंडखोरांवर टीकेचा आसुड ओढताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्हीच शिवसेना म्हणून सांगता, पण शिवसेनेचे नाव घेण्याची तुमची लायकी आहे का? असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे रक्त, लाज व स्वाभिमान असता तर सुरतहून गुवाहाटीला पळाले नसते. महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले, अन्यथा समोर येऊन सांगितले असते, असे ते म्हणाले. प्रकाश सुर्वे यांचे मला आश्चर्य वाटते. त्यांची सर्व कामे केली, फंड दिला. दिलीप लांडे माझ्या हातात हात घेऊन रडले. हे कसे जाऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला.

या मेळाव्याला आमदार संजय पोतनीस, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, महिला विभाग संघटक  संजना मुणगेकर, नगरसेवक विजयेंद्र शिंदे, महेश पेडणेकर, उपविभागप्रमुख नंदकुमार जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कश्मिरी पंडितांना सुरक्षा द्या

आसाममध्ये पूर आला आहे. तेथील लोकांना खायला अन्न नाही, घर वाहून गेले आहे आणि तुम्ही गुवाहाटीला मजा मारायला जाता. चार्टर्ड विमान, हॉटेल व कपडय़ांचा खर्च किती झाला, असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारने कश्मिरी पंडितांना सुरक्षा देण्याऐवजी बंडखोर आमदारांना सुरक्षा दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

20 मे रोजीच शिंदे यांना दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर

20 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असे विचारले होते. तेव्हा रडारडा केली आणि 20 जून रोजी त्यांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे यांना क्रमांक दोनचे नगरविकास खाते दिले, रस्ते विकास महामंडळ दिले. या  ठिकाणी महत्त्वाची खाती होती, मानसन्मान होता. पण तिथे गेलेल्या बंडखोरांना मान व हात पकडून कैद्यासारखे सुरत ते गुवाहाटी फरफटत नेले. त्याचा व्हिडीओही सर्वांनी पाहिला. एकनाथ शिंदे व बंडखोरांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.