वीज निर्मितीतील कोळशाचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सर्व औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांचा सर्वंकष अभ्यास केला जाईल. जेणेकरून जुने झालेले आणि कोळशावर आधारित असलेले अधिक प्रदूषण करणारे वीजनिर्मिती प्रकल्प टप्प्या टप्प्याने कमी केले जातील. नागपूरच्या नांदगाव आणि वारेगाव येथील अॅश पॉण्ड कायमस्वरूपी बंद करून त्या जागा वेगाने पूर्ववत केल्या जातील, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नागपूरवासीयांना दिले.

ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी नागपूर जिल्ह्यातील नांदगाव येथे भेट देऊन संवाद साधला. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यातील सर्व विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपायायोजनांचे ऑडीट केले जाईल. जे प्रकल्प विहित मानकांची पूर्तता करत नसतील त्यांना निर्णायक कारवाईला सामोरे जावे लागेल. पुढील पंधरा दिवसात नांदगाव अॅश पॉण्डची जागा पूर्ववत करण्यात येईल. प्रदूषण कमी करण्याबाबतची योजना ठरवली जाईल.

स्थानिकांकडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत

नांदगाव येथील स्थानिकांनी ठाकरे यांना भेटून फ्लाय अॅशचा त्यांच्या जनजीवनावर कसा परिणाम झाला आहे हे समजावून सांगितले. नांदगावमध्ये फ्लाय अॅशची विल्हेवाट लावणे थांबविण्याच्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. स्थानिकांच्या मदतीने येथील जमीन पूर्ववतः करण्याची योजना आखावी लागेल. आता कोठे कामाची सुरुवात झाली असून बराच पल्ला गाठायचा आहे, असे सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या (सीएफएसडी) लिना बुद्धे यांनी सांगितले.

वीजनिर्मिती प्रकल्पांतील राखेचा उपयोग पायाभूत सुविधांसाठी

राज्यातील सर्व विद्युतनिर्मिती केंद्रावर प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उपाययोजना, हवा प्रदूषणासाठी एफजीडी (flue gas desulphurisation – FGD) उभारणीसहीत केल्या जातील असे त्यांनी नमूद केले. त्याची सुरुवात कोराडी आणि खापरखेडा येथून होईल. पेंद्र सरकारच्या नियमांनुसार फ्लाय अॅशचा 100 टक्के वापर केला जाईल तसेच पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्येदेखील फ्लाय अॅशचा वापर केला जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले.