
” असत्य आणि अन्यायाविरोधात सामना करायला संजय राऊत पुन्हा रणांगणात येतायत’, अशी प्रतिक्रीया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला.
”जेव्हा संजय राऊत यांना तुरुंगात घेऊन जात असताना ते म्हणालेले की महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न होतोय. तसंच आता सुरू आहे. सध्या विरोधकांवर सतत हल्ले सुरू वआहेत. शिवसेनेला फोडण्याचा प्रयत्न होतोय. महिला नेत्यांना त्रास दिला जातोय. किशोरी ताईंचा छळ होतोय. सुषमाताईंना नजरकैदेत ठेवले जातेय. इतर नेत्यांना अटकेत टाकण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या सभा रद्द होतायत. शेतकरी त्रस्त आहे. बेरोजगार त्रस्त आहेत. महिलांना शिवीगाळ होतेय. हे खोके सरकार एवढं निर्दयी घटनाबाह्य आहे की खोटे केसेस टाकून लोकांना त्रास देत आहेत. तडीपार केले जात आहे. आज संजय राऊत साहेब सत्यासाठी लढत होते. ते या डरपोकांसारखे पळून गेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली. मात्र आता हा लढा देण्यासाठी पुन्हा एकदा ही तोफ मैदानात आली आहे. आपण बघाल, राऊत इज नॉट आऊट, पुन्हा बॅटिंगला तयार. असत्य आणि अन्यायाविरोधात सामना करायला पुन्हा रणांगणात ते येतायत”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.





























































