गँग लीडरच मुख्यमंत्री असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? आदित्य ठाकरे यांचा घणाघात

मिंधे बदनाम आहेतच, मात्र त्यांच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय, मंत्रालयातील गुंडांची टोळी महाराष्ट्राला बदनाम करतेय, जर गँगलीडरच मुख्यमंत्री असेल तर न्याय कुणाकडे मागायचा? असा जबरदस्त घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. राज्यात नवीन उद्योग आणायला उद्योजक तयार नाहीत. त्यामुळे सर्वांनी मोठ्या हिमतीने गुंडांचे राज्य उलथवून लावण्यासाठी सज्ज व्हा अशी असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. कल्याणमधील कोळसेवाडी शाखेला भेट दिल्यानंतर त्यांनी शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, काल परवाकडे इथे जे झालं ते तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल. गोळी काही साध्यासुध्या माणसाने घातली नाही. एका आमदाराने पोलीस स्टेशनच्या केबिनमध्ये बसून गोळी घातली. नंतर त्या भाजपच्या आमदाराने टीव्हीवर येऊन सांगितलं की का गोळी घातली ते. जे काही न्यायालयात व्हायचं ते होणारच आहे. सीसीटीव्हीमध्ये जे पकडलं ते पकडलं गेलं आहे. आमदारांनी सांगितलं की का त्यांना राग आला,का त्यांचं संतुलन गेलं. हे सगळं सांगितलं आहे. पण आज मी तुम्हाला विचारायला आलो आहे की दोन्ही बाजूंनी ही जी गुंडागर्दी सुरू आहे, चिंधीचोरांचं राज्य आहे, ते तुम्ही पळवून लावणार की नाही, हे आज तुम्हाला विचारायला आलो आहे. या सगळ्या कारनाम्यामध्ये असं नका वाटून घेऊ की बदनाम फक्त भाजप किंवा मिंधे होत आहेत. मिंधे हे मिंधेच आहेत त्यांना बदनाम करण्याची गरज नाही. त्यांचं नाव मिंधे, गद्दार झालं आहे. या सगळ्यात आपला महाराष्ट्र बदनाम होतोय. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. कल्याणमधील गद्दार खासदाराला चॅलेंज देतोय, पुन्हा निवडणुक लढवून दाखवाच, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिलं.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्याच्या वृत्तावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आत्ताच मला ती बातमी कळली. हाच मुद्दा आहे की किती दिवस हे सहन करायचं. यात महाराष्ट्र बदनाम होतोय. लोकांना भीती वाटतेय ती दिसतेय. महाराष्ट्रात उद्योगजगतही येणार नाही अशी परिस्थिती बनत चालली आहे. हा गुंडाराज चालू आहे. यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे गँगलीडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. तिथेच महाराष्ट्राची अडचण झाली आहे. मुख्यमंत्री या सगळ्यांना वाचवताहेत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.