ठाण्याचा इलाका हमारा! धमाका भी हमारा ही होगा!! गद्दारांना कायमचे गाडण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात

आज मी ठाण्यात येणार म्हणून बातम्यांवर सुरू होतं की मिंध्यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे येणार… हा बालेकिल्ला त्यांचा नाही. एक इंचही नाही. ये इलाका भी हमारा है.. धमाका भी हमारा ही होगा, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. या अलिबाबा आणि 40 चोरांना लोकसभा, विधानसभाच काय महापालिकेची पायरीही चढू द्यायची नाही, अशी गर्जना आदित्य ठाकरे यांनी केली तेव्हा ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी ठाणे दणाणून गेले.

ठाण्यातील शिवसेना शाखांना भेटी, नागरिकांशी साधला संवाद

महानिष्ठा, महा न्याय आणि महाराष्ट्र असा नारा घुमवत आदित्य ठाकरे यांचा आज ठाण्यात शाखा भेटींचा झंझावाती दौरा झाला. ‘गद्दारांना कायमचे गाडण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात’ असे मोठे फ्लेक्स ठाण्यात ठिकठिकाणी झळकत होते. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आनंद नगर, मानपाडा, मनोरमा नगर आणि जिजामाता नगर येथील शाखांचे दणक्यात उद्घाटन झाले. तसेच ढोकाळी आणि चंदनवाडी येथील शाखांना आदित्य ठाकरे यांनी मॅरेथॉन भेटी दिल्या. या वेळी त्यांनी शिवसैनिकांशी चर्चा केली आणि ठाणेकरांशी संवाद साधला. या प्रत्येक शाखा भेटीत आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक आणि ठाणेकरांची तुफान गर्दी लोटली होती. या वेळी झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी मिंध्यांना थेट ठाण्यातूनच आव्हान दिले.

अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा
भाषणाच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांनी दिवंगत शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या आठवणीना उजाळा दिला. ते म्हणाले, 93-94ला आपण जिंकलो तेव्हा अनंत तरे महापौर झाले. मी लहान होतो. पण माझी आजी खूष होती. शिवसेनाप्रमुखही आनंदीत झाले होते. या सगळय़ा जुन्या आठवणी आहेत. ठाणेकरांनी इतपं प्रेम दिलं आहे की, गद्दार आपल्यातून निघून गेले याचा काडीमात्र परिणाम शिवसेनेवर झालेला नाही.

मला वाचवा, भाजप मला जेलमध्ये टाकेल
भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, असे नाटक मिंध्यांनी काही वर्षांपूर्वी कल्याणमध्ये केले. 20 मे 2022ला वर्षावर येऊन उद्धवजींसमोर ते पुन्हा ढसाढसा रडले. मला वाचवा, भाजप मला जेलमध्ये टाकेल. जेलमध्ये जाण्याचे माझे वय नाही, असे रडगाणे ते गात होते. पण त्यानंतर एक महिन्यांनी शिवसेना चोरून ते भाजपमध्ये गेले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तुमच्यावर विश्वास होता. पण या नीच, निर्लज्ज मिंध्यांनी त्यांचा ठरवून विश्वासघात केला. पण येत्या निवडणुकीत ठाणेकरांसह अवघा महाराष्ट्र या गद्दारांना धडा शिकवेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

मिंधेंची शेती अमावास्या पौर्णिमेला

मी शेतकऱयाचा मुलगा आहे असे मिंधे सांगत असतात. तुम्ही सगळे त्यांना पाहताय. ते शेती केव्हापासून करायला लागले? बंगला कधी झाला? दुसरा बंगला कधी बनतोय? हे घटनाबाह्य मुख्यमंत्री नेमकं कोणतं पीक आपल्या शेतात लावतात. त्यांच्या गावात धड रस्ता नाही, पण शेतात दोन हेलिकॉप्टर जातात. हे कसले गरीब शेतकरी. त्यांची शेती अमावस्या पौर्णिमेला होते. रात्री चंद्राच्या प्रकाशात ते नेमकं काय पिकवतात तेच कळत नाही, अशी सणसणीत चपराक आदित्य ठाकरे यांनी लगावली.

या वेळी शिवसेना नेते, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, नरेश मणेरा, महिला जिल्हा संघटक, समिधा मोहिते, रेखा खोपकर, उपजिल्हाप्रमुख कृष्ण कुमार कोळी, संजय घाडीगावकर, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहरप्रमुख वसंत गवाळे, सचिव ठाणे विधानसभा सुरेश मोहिते, सहसचिव विश्वास निकम, सचिव ठाणे शहर संजीव कुलकर्णी, प्रवत्ते चिंतामणी कारखानीस, अनिष गाढवे, चंद्रभान आझाद, सहप्रवक्ता तुषार रसाळ, समन्वयक संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, शाखाप्रमुख अमोल हिंगे, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकांक्षा राणे, संपदा पांचाळ, महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर, वासंती राऊत, प्रमिला भांगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, कुंदा दळवी, भारती गायकवाड, महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल हुंडारे-मिंढे, महिला विभाग संघटक संपदा उरणकर, ज्योती कोळी, नंदा महेश कोथळे, महिला उपविभाग संघटक राजेश्री नवीन सुर्वे, उषा बोरुडे, अनिता हिलाल, ज्योती दुग्गल, ठाणे शहर युवासेना उपजिल्हा युवाधिकारी अर्जुनसिंग डाभी, युवाधिकारी किरण जाधव, ओवळा-माजिवाडा विभाग युवाधिकारी नटेश पाटील, कोपरी-पाचपाखाडी विभाग युवाधिकारी राजेश वायाळ, ठाणे शहर विधानसभा चिटणीस रितेश देशमुख, ठाणे शहर विधानसभा उपसमन्वयक सौरभ निकम, महाराष्ट्र सहसचिव धनश्री विचारे, विधानसभा अधिकारी ओवळा माजिवडा पूजा भोसले, जिल्हा समन्वयक युवतीसेना आरती खळे, सोशल मीडिया समन्वयक रोशनी शिंदे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

2024 हे वर्ष आपले आहे. त्यामुळे आपण पुन्हा ठाणे जिंकणारच.
ठाणे आणि शिवसेना हे नाते कुणी बदलू शकत नाही. ठाणे म्हणजे मिंधे नव्हे. ठाणे म्हणजे शिवसेना, म्हणजे आपणच.
खोके सरकार हे भ्रष्ट लोकांचं, गुंडांचं, चिंधीचोरांचं, कॉन्ट्रक्टरांचं सरकार आहे.
आज भाजप आणि मिंधे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलायला निघाले आहेत.
सर्वसामान्यांना छळणाऱया, खोटारडय़ा, रडक्या 40 चोरांना फिरू द्यायचे नाही, असा निर्धार जनतेने केला आहे.

मंत्रालय गुजरातला हलवतील, ठाणे गुजरातला विकतील
महाराष्ट्र सगळय़ाच बाबतीत पिछाडीला चाललाय. पण मिंधे दिल्लीला जाऊन लोटांगणे घालत आहेत. या खोके सरकारने एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. उलट इथलेच प्रकल्प गुजरातला पळवले. ते जसे लपून छपून गुजरातला पळाले तसेच एकेक प्रकल्प ते गुजरातला पाठवत आहेत. थोडय़ा दिवसांनी ते मंत्रालय गुजरातला हलवतील आणि ज्याप्रमाणे पक्षप्रमुखांच्या आजारपणाचा फायदा घेत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून पक्ष चोरला तसे ठाणेही गुजरातला विकून टाकतील, सावध राहा, असा इशाराच आदित्य ठाकरे यांनी दिला.

मिंध्यांना रडत बघायची आम्हाला सवय आहे
एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूरच्या भाषणाच्या सभेची नक्कल आदित्य ठाकरे यांनी केली तेव्हा प्रचंड हशा उसळला. ते म्हणाले, खोटं बोल पण रडून बोल यासाठीच मिंधेंनी अधिवेशन घेतलं. माझे वडील किती अपयशी आहेत हे त्यांच्या मुलाने आधी सांगितले आणि तेच मिंधेंनाही लोकांना सांगायचे होते. नवरा म्हणून, वडील म्हणून मी अपयशी ठरलो, असे सांगत ते अधिवेशनात रडले. पण त्यांना रडत बघायची सवय आहे. डोळय़ातून अश्रू गाळायचे, रडायचे आणि हवे ते मिळवायचे. हेच त्यांनी आजपर्यंत केले. आता दोन दिवसांनी मी घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो, शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलो असेही ते सांगतील, असे टोले आदित्य ठाकरे यांनी हाणले.