
मुंबईसह राज्यातील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृहे कष्टकरी मुंबईकरांच्या सोयीसाठी चोवीस तास खुली ठेवली पाहिजेत अशी दूरदृष्टीपूर्ण संकल्पना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम मांडली होती. त्या संकल्पनेचे युवा पिढीने स्वागत केले होते. परंतु भारतीय जनता पक्षाने संस्कृती आणि संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत टीका केली होती. आता भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनेच त्यासंदर्भात जीआर काढून परवानगी बहाल केली. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. मजेशीर आहे…शिवसेनेच्या ’मुंबई 24/7’ धोरणावर टीका करणाऱया भाजपने त्याचाच जीआर काढला, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट केली आहे. कष्टकरी मुंबईकरांना रात्री उशिरापर्यंत जेवणाखाण्याची, थोडा निवांत आनंद घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात नक्की काय अडचण आहे? अशी विचारणा आपण त्यावेळी भाजपला केली होती. आजही पुन्हा तेच विचारतोय, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.
भाजपचं मत आता नेमकं का बदललं?
“मुंबई कष्टकऱयांचं शहर आहे आणि हे शहर 24/7 धावतच राहतं. जानेवारी 2020 पासूनच हे धोरण अस्तित्वात आहे आणि तेव्हा भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता. नवा अध्यादेश काढण्याची काही गरजच नव्हती. पण भाजपला आता आपलं मत बदलण्यास नेमकं काय कारणीभूत ठरलं?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात यासंदर्भात आलेल्या बातम्यांचा दाखलाही आदित्य ठाकरे यांनी या पोस्टमध्ये दिला आहे.