पाकिस्तानशी क्रिकेट म्हणजे देशवासीयांच्या भावनांशी थट्टाच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

पहलगाममध्ये निष्पाप हिंदुस्थानींचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, अशी देशवासीयांची भावना आहे. तरीही आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानबरोबर खेळण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला आहे. पाकिस्तानशी क्रिकेट म्हणजे देशवासियांच्या भावनांशी थट्टाच, असे म्हणत, हे सर्व ब्लॉकबस्टर फिक्स्चर असल्याचे दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे एक प्रसिद्धीपत्रकही शेअर केले आहे. त्यात आशिया कप स्पर्धेतील हिंदुस्थान-पाकिस्तान लढतीचा उल्लेख ‘ब्लॉकबस्टर फिक्स्चर’ असा केला आहे. आदित्य ठाकरे यांनी यावरून बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. हिंदुस्थान सरकार या निर्णयावर एकही शब्द बोलत नाही, याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्र सरकार काहीच बोलत नाही ही लाजीरवाणी गोष्ट

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्पृत दहशतवादाचा निषेध करण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवल्यानंतरही केंद्र सरकार बीसीसीआयला आशिया कपमध्ये खेळण्यापासून माघार घेण्यास सांगण्यास तयार नाही, ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

मृतांच्या जिवावरम पैसे कमावले जातायत

दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जिवांवर आणि स्वतःचे जीवन धोक्यात घालून आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या जिवांवर पैसा कमावला जातोय आणि मनोरंजन सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

भाजपला निवडणुकीत पाकिस्तानचा वापर करायचाय

पाकिस्तानसारख्या दहशतवादी देशासोबत संबंध तोडण्याऐवजी त्यांच्याबरोबर क्रिकेट का महत्त्वाचे आहे, असा प्रश्न शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी संसदेतही उपस्थित केला होता. दहशतवादी हल्ले होत असूनही क्रिकेट सुरू आहे. हा केंद्र सरकारकडून पाकिस्तानला दिलेला मैत्री दिनाचा संदेशच म्हणावा लागेल. खरी मैत्री अशीच असली पाहिजे. समर्पित आणि एकतर्फी. पाकिस्तान निष्पाप हिंदुस्थानींवर हल्ला करू शकते तरीही आपण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू. कारण भाजपा निवडणुकीत त्यांचे नाव नेहमीच वापरू शकतो, असेही टीकास्त्र आदित्य ठाकरे यांनी डागले आहे.