एकरांवर पसरलेले कोळीवाडे एक-दोन इमारतींमध्ये डांबता येणार नाहीत, आदित्य ठाकरे यांची मिंधे-भाजप सरकारवर टीका

वरळीसह मुंबईत कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासाचा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र, मिंधे सरकार आणि भाजप सरकारला कोळीवाडय़ांचे क्लस्टर डेव्हलपमेंट करायचे आहे. मात्र, ते कोळीवाडे म्हणूनच राहिले पाहिजे, गावठाणे म्हणूनच राहिले पाहिजे. अनेक एकरांवर पसरलेले कोळीवाडे मिंधे सरकारला एक दोन इमारतींमध्ये आणून डांबायचे आहेत. मात्र, शिवसेनेचा याला जोरदार विरोध आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचा कोळीवाडय़ांच्या क्लस्टर डेव्हलपमेंटला विरोध असल्याचे स्पष्ट केले. भाजपला कोळी बांधवांना मुंबईच्या बाहेर काढायचे आहे मुंबईतून भाजपला कोळी बांधवांना बाहेर काढायचे आहे. कोळीवाडे आहेत ते मुंबईच्या बाहेर काढायचे आहेत. तसे भाजपने ठरवले आहे. पियूष गोयल यांना माशाचा वास आवडत नाही. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मंडई हलवायची ठरवली आहे. हेच धोरण मासे विव्रेते आणि कोळीवाडय़ांबाबतही भाजपने अवलंबले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपचे नवउद्योजक आणि जुने उद्योजक म्हणजे फक्त अदानी

भाजप तरुणांना उद्योजक बनवणार आहे, असे म्हणतोय. पण भाजप उद्योग म्हणून तरुणांना भजी तळायला लावणार आहे, ही त्यांची योजना आहे. महाविकास आघाडीने आणलेले उद्योग मिंधे-भाजप सरकारने गुजरातमध्ये पळवले. त्यांचा नवा उद्योजक म्हणजे अदानी आणि जुना उद्योजक म्हणजे पण अदानीच आहे. सब का मालिक अदानी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजप हा जुमलेबाज पक्ष

भाजपने लाडकी बहीण योजनेतील महिलांना देण्यात येणाऱया पैशात वाढ करण्याची घोषणा, तरुणांना 25 लाख नोकऱया देण्याची घोषणा म्हणजे फक्त घोषणा आहे. अशी आश्वासने भाजप गेली 10 वर्षे देत आहे. भाजप 2014 ला 2 कोटी नोकऱया देऊ, असे सांगत होता. पुढच्या टप्प्यात हा आकडा कोटीत घेऊन जातील. भाजपने आतापर्यंत एक तरी काम केल्याचे दाखवा. त्यामुळे भाजप हा फक्त जुमलेबाज पक्ष आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.