मुंबईतील साडेआठ हजार कोटींची कामे खोक्यांसाठी रखडली, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाकर्त्या मिंधे सरकारने मुंबईत साडेआठ हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे खोक्यांसाठी दोन वर्षांपासून रखडवली आहेत, असा जोरदार हल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. या कामांसाठी एनओसी देऊ नका म्हणून ट्रफिक पोलिसांवर सरकारकडून दबाव आणला गेला असून, एनओसी न मिळाल्यानेच कामे रखडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद बोलवून रस्ते घोटाळय़ावरून खोके सरकार, पालिका प्रशासक आणि कंत्राटदारांच्या सिंडिकेटवर जोरदार हल्ला चढवला. मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा ज्या पालिकांमध्ये प्रशासक आहेत तिथे घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘‘मुंबईत रस्त्यांची कामे साधारणपणे 1 ऑक्टोबर ते 31 मे या कालावधीत होतात. 2021-22 ला अडीच हजार कोटींची कामे सुरू झाली होती. ती पूर्ण व्हायला 24 ते 36 महिने लागतील असे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात सांगितले होते, परंतु ती कामे अजूनही तशीच पडून आहेत,’’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

यंदाच्या जानेवारीपासून सुरू केलेली कामेही रखडली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘‘जानेवारीपासून साडेसहा हजार कोटींची कामे सुरू केली गेली. नारळ पह्डला गेला. गाजावाजा केला. हार्ंडग्ज लावले. जाहिराती केल्या. बॅनर्स लागले, पण आज ऑक्टोबर संपत आला तरी ती कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.’’

कंत्राटदाराला काळय़ा यादीत टाकणार की, सेटलमेंट करणार

आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘‘मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कंत्राटदार आहेत. त्यापैकी एका पंत्राटदाराला टर्मिनेशन नोटीस दिली गेली. त्या नोटिशीला पंत्राटदाराने उत्तरही दिले. पुढील आठवडय़ात त्याची सुनावणी आहे. आता त्या कंत्राटदारावर कारवाई करून त्याला काळय़ा यादीत टाकणार की, खोके घेऊन सेटलमेंट होणार, याकडे आमचे बारीक लक्ष आहे. स्ट्रीट फर्निचर, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन घोटाळय़ावरही आमचे लक्ष आहे.’’

मुंबईत धुळीमुळे प्रदूषण

मुंबईमध्ये होणारे प्रदूषण हे धुळीमुळे होतेय असेही आदित्य ठाकरे म्हणाले. बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणांमधून येणाऱया धुळीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे ते म्हणाले. महापालिकेने फक्त गाइडलाइन्स काढल्या, परंतु त्याचे पालन होत नाही असे ते म्हणाले.

पोस्टिंगसाठी खोके मागितले जाताहेत

‘‘मुंबईत महानगरपालिकेचे 24 वॉर्ड आहेत. त्यातील 15 वॉर्डांमध्ये वॉर्ड अधिकारी नाहीत. परीक्षा झाल्या आहेत, रिझल्ट लागले आहेत, पण पोस्टिंगसाठी खोके मागितले जात आहेत,’’ असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी या वेळी केला. खोके सरकारने मुंबईची अशी परिस्थिती करून ठेवल्यावर कोणता उद्योग इथे येणार? असा सवालही त्यांनी केला.

कालच घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना भेटलो…

‘मी पुन्हा येईन’ अशी भाजपने सोशल मीडियावर केलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टचाही उल्लेख या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला. त्यावर त्या वेळी मुख्यमंत्री कुठे होते? दिल्लीत होते की, मुंबईत? असा मिश्कील सवाल करतानाच आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘‘एक गुपित सांगायचे राहूनच गेले. कालच माझी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. मी विचारले, ‘‘कल शाम आप कहा थे?’’ त्यावर ते लाजले आणि म्हणाले, ‘‘ऐसी बाते क्यू पुछते हो जो बताने के लायक नही है.’’ यावर पत्रकार परिषदेत हशा पिकला. नंतर आदित्य ठाकरे यांनी असे काही घडले नसल्याचेही स्पष्ट केले.

बुलेट ट्रेन येण्यापूर्वी बरेच उद्योग गुजरातला पाठवले, ट्रेन आल्यावर किती पाठवतील!

बीकेसीतील डायमंड बोर्ड गुजरातला हलवला जात असल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी या वेळी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर बुलेट ट्रेन येण्यापूर्वी वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क, एअर बस टाटा, डायमंड बोर्ड सर्व गुजरातला पाठवलेय. आता ट्रेन आल्यावर किती पाठवतील याचा विचार करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘‘डायमंड बोर्डला बीकेसीतील जागाही फुकट दिलेली आहे. त्यात महाराष्ट्र शासनाची गुंतवणूक आहे. मग नक्की हे सरकार कोण चालवतेय? कुठून चालवले जातेय?’’ असा खोचक सवालही त्यांनी केला.

चिपळूणचा पूल कोसळला त्याच कंत्राटदाराला मुंबईत कामे

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच तो कोसळला होता. त्याच पंत्राटदाराला मुंबईच्या पूर्व महानगरात साधारण हजार कोटींची कामे दिली गेली असल्याकडेही आदित्य ठाकरे यांनी या वेळी लक्ष वेधले. चिपळूणच्या दुर्घटनेबद्दल त्या कंत्राटदाराची काय चौकशी झाली? त्याच्यावर काय कारवाई झाली आणि होणार असेल तर त्याला दिलेल्या मुंबईतल्या कामांचे काय? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

खोके सरकारमध्ये फक्त कंत्राटदारांचे लाड चाललेले आहेत. काम सुरू करू नकोस, पण पैसे मिळताहेत ते आम्हाला दे, असा कंत्राटदारांवर दबाव आहे. आमचे सरकार येणारच आहे. त्यानंतर मुंबईतील सर्व घोटाळय़ांची चौकशी करू. मंत्री, प्रशासक, अधिकारी कुणीही असो, त्यांच्यावर कडक कारवाई करणारच. मुंबईला लुटणाऱयांना तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही.