
मुंबई महापालिकेवर सर्व राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्षांचे राजकारण सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे शिवसैनिकांचे शिवसेनेवरील प्रेम पुन्हा दिसून आले. आता शिवसेनेतून घाण निघून गेली आहे. आता जे काही होणार ते चांगलेच होणार, असा विश्वास युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबईत शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राजकारण म्हटल्यावर लोक कसे बदलतात का बदलतात, हे आपल्याला माहिती आहे. मात्र, आता जे पळून गेले त्यांना आपण काय आणि कधी कमी दिले ते त्यांनी सांगावे. शिवसेना पक्ष प्रमुखांचा जनतेशी संवाद सगळ्यांनी बघितला आहे. कोरोना काळात कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची भूमिका सर्वांना माहिती आहे. त्यांनी केलेले काम जनतेला माहिती आहे.त्यांनी हाताळलेल्या कोरोना परिस्थितीमुळे जगभरात त्यांचे कौतुक होत आहे. आम्ही जे काही केले ते राज्यासाठी केले. पक्षप्रमुख म्हणून ते शब्दाला जागणारे आहेत. शिवसेना परिवार म्हणजे काय, हे आता समजत आहे.
सचिन अहिर पक्षात आल्यानंतर त्यांना कधीही त्यांच्या आधीच्या पक्षावर टीका करायला सांगितली नाही. ते आमचे संस्कार नाहीत. त्यांनी पक्षावत दाखवलेल्या निष्ठेमुळे त्यांना विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द पाळला. फेसबुक लाइव्हनंतर त्यांनी सांगितले की हा वर्षा बंगला आपल्याला सोडायचा आहे. असा मोह नसलेला मुख्यमंत्री आपल्याला मिळाला आहे. पळून गेलेल्यांनी सांगावे, त्यांनी आपल्याला सांगितलेले काम आपण केले आहे. त्यांनी सांगितलेले काम आपण केले नाही, असे कधी झाले नाही. त्यामुळे आपली माणसे सोडून गेली, याचे वाईट वाटते. विरोधी पक्षांमुळे नाही तर आपल्या लोकांमुळेच आपला दगा झाला आहे. आपल्या प्रेमाची माणसे सोडून जातात, तेव्हा आपले काय चुकले असा प्रश्न पडतो.
वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे जाताना रस्त्यावर सर्वसामान्य जनता होती. शिवसैनिक आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री म्हणून ते श्रेष्ठ आहेच, पण व्यक्ती म्हणूनच सर्वश्रेष्ठ आहेत, अशी जनतेची भावना दिसून आली. ज्या दिवशी फ्लोअर टेस्ट होईल, त्या दिवशी त्यांची हिंमत बघू. विमानतळावरून विधानभवनाकडे जाणारे मार्ग आपले आहेत. ही मुंबई, हा महाराष्ट्र आपला आहे. तो कोणाचा होऊ देणार नाही. जे चालले आहे, ते लोकशाहीला आणि न्यायाला धरून आहे का, या प्रश्नाचे उत्तर त्यांना राज्याला, देशाला आणि जगाला द्यावे लागणार आहे.
त्याच्यात हिंमत असती तर ते सूरतला गेले असते का , तेथून गुवाहाटीला पळाले. हे सर्व रात्री झाले. हिंमत असती तर ठाण्यात बसूनच बंड केले असते. काही आमदारांचे अपहरण करून त्यांना नेले आहे. आपले दोन शूर पळून आले आहे. जेवणासाठी नेतो, असे सांगून त्यांचे अपहरण केले. काहीजण तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरून, प्राइज टॅग लावून गेले, ते आपले कधीच नव्हते. त्यांच्या प्रत्येक दिवसांचा लाखोंचा खर्च होत आहे. पूरपरिस्थितीत तेथे सर्वसामान्य जनता बुडत आहे. आपण तेथे मुख्यमंत्री असतो, तर पूरपरिस्थितीत जनतेला मदत केली असती. पूरपरिस्थिती असलेल्या राज्यात असे चालले आहे. आता आपल्याला लढायचे आहे आणि जिंकायचे आहे. सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जाणारे हे पहिलेच उदाहरण असेल. शिवसेनेत प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार आहे आणि ते जिंकणारच आहे.
हिंमत असेल तर शिवसेनेसोबत लढण्याची ताकद असेल तर राजीनामे पाठवा आणि आमच्याविरोधात निवडणुकीला तयार राहा. दगाबाजांना आता महाराष्ट्रात जागा नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या पद्धतीने बंडखोरांना धडा शिकवणार असल्याचे महिला आघाडीने ठरवले आहे. ते तिथे गेल्यावर त्यांना कैदी आणि बंद्यासारखे वागवत आहेत. असे राजकारणात व्हायला लागले, तर आपल्याला काय करायला हवे, हे पाहिल्यावर आपल्या देशात लोकशाही राहिली काय असा प्रश्न पडतो.
जे पळून गेले आहेत. त्यांना महाराष्ट्रातून पळवून लावायचे आहे. त्यात आपलाच विजय होणार आहे. आपण अयोध्येला गेल्यानंतर जे झाले आहे, ते चांगलेच झाले आहे. आता जे झाले आहे, त्यातूनही चांगलेच निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
































































