माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुल मंडईत मूलभूत सुविधा द्या! आदित्य ठाकरे यांनी साधला विक्रेत्यांसोबत संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुल मंडईची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंडईच्या व्यवस्थापन समितीसोबत तसेच येथील व्यावसायिक फुल विक्रेत्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मंडईत पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात फुल मार्केटच्या मागील व पुढील अशा दोन्ही जागांचे सुशोभीकरण करण्याचा नियोजित आराखडा होता, जेणेकरून आदर्श फुल मार्केट कसे असावे हे पाहण्यासाठी पर्यटकांनी येथे आवर्जून यावे. मात्र सध्याच्या प्रशासनाकडून त्या दृष्टीने कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, नगरसेविका श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव-नगरसेवक साईनाथ दुर्गे, शाखाप्रमुख प्रवीण नरे, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, शाखा समन्वयक रविकांत पडयाची, युवासेनेचे सुशांत गोजारे, चंद्रकांत झगडे, महाराष्ट्र वितरक सेनेचे संतोष देवरुखकर मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवराज मंडलिक, उपाध्यक्ष अविराज पवार, कार्याध्यक्ष प्रकाश बुचके, सचिव अजय कसाले, उपसचिव बापूसो लोके, खजिनदार मच्छिंद्र शेलार, प्रमुख सल्लागार मनोज पुंडे, संचालक गणेश शेरकर, दादाभाऊ येणारे, रामदास भोसले, अजय खाडे, तुषार भोसले, किशोर भगत राजेंद्र पवार, प्रवीण पुंडे उपस्थित होते.

पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी

माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाच्या वतीने यावेळी आदित्य ठाकरे यांना फुल मार्केटच्या समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. मंडईत पार्किंग सुविधा अपुरी असल्यामुळे फुलांच्या वाहतूकीस अडचण होत आहे. फुलबाजारातील टेम्पो आणि ग्राहकांसाठी परिसरात जागा उपलब्ध करून द्यावी, फुलबाजाराच्या शेडच्या छतावर फॉगर फॅन बसवावेत, अशी मागणी यावेळी फुल व्यापाऱयांनी निवेदनाद्वारे केली.