
वेरूळ, अजिंठा येथील शिल्पसौंदर्य, रंगाकृती अचंबित करणार्या आहेत. अद्भूत, अद्वितिय अशी ही कारागिरी पाहून मी नि:शब्द झालो आहे. जागतिक स्तरावर या ऐतिहासिक वारशाचे मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या दोन महिन्यात त्यासाठी विशेष मोहिम आखण्यात येईल असा शब्द पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दोन दिवस संभाजीनगर दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेण्यांना भेट दिली. त्यांच्यासोबत पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार प्रशांत बंब आदी होते. लेणी परिसरात वनविभागामार्फत उभारण्यात आलेल्या महादेव वनउद्यानाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पर्यटक अभ्यागत केंद्राची पाहणी केली. सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेले हे केंद्र पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार असून त्यासाठी खासगी उद्योगांची मदत घेणार असल्याचे ते म्हणाले.
कैलासशिल्प पाहून आदित्य ठाकरे भारावले
लेणीसमुहातील 16 व्या क्रमांकाचे कैलास लेणे आदित्य ठाकरे यांनी पाहिले. त्यांना गाईड पंकज कवडे यांनी लेणीची माहिती दिली. लेणीतील विविध भावमुद्रेतील शिल्पे, रामायण व महाभारतातील विविध प्रसंग, कैलास मंदिर, त्यातील भव्य शिवलिंग, रंगकामातील कलाकुसर व त्याची भव्यता पाहून आदित्य ठाकरे अचंबित झाले. लेणी पाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा ठेवा जागतिक स्तरावर नेण्यासाठी विशेष मोहिम आखण्यात येईल आणि येत्या दोन महिन्यात यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल असे सांगितले.
लेणी पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी छत्रपती मालोजी राजे भोसले यांच्या गढीला भेट दिली. या ऐतिहासिक गढीच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच संबंधित अधिकारी व पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्याचे आदेश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
अजिंठ्याचे रंगवैभव रोमांचित करणारे
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अजिंठा लेणीसमुहातील पाच लेण्या पाहिल्या. लेण्यांमधील रंगवैभव, शिल्पसौंदर्य थक्क करणारे असल्याचे ते म्हणाले. अजिंठा लेणीत त्यांनी तब्बल तीन तास घालवून बारकाईने माहिती घेतली. लेण्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी महणाले.



























































