चलो अयोध्या; मे महिन्यात आदित्य ठाकरे जाणार रामलल्लाच्या दर्शनाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, ही आमची पायवाट आहे. गेली 30 वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचे एक नाते निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला दौऱयासाठी फार तयारी करावी लागणार नाही.

श्रीरामजन्मभूमी अयोध्या, तेथील राममंदिराचे निर्माण आणि शिवसैनिक हे दृढ नाते आहे. याच नात्याने ‘चलो अयोध्या’चा नारा शिवसेनेने पुन्हा एकदा बुलंद केला आहे. शिवसेना नेते-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे मे महिन्यात अयोध्या दौऱयावर जाणार असून या दौऱयासंदर्भात शिवसेना भवनात आज बैठक पार पडली. या बैठकीविषयीची माहिती शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. गेली 30 वर्षे शिवसेना आणि अयोध्या हे एक नाते आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱयाची तारीख चार-पाच दिवसांत निश्चित केली जाईल, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना भवन येथे शिवसेना नेते-पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्यासह पदाधिकाऱयांची एक बैठक पार पडली. या बैठकीविषयी पत्रकारांना माहिती देताना शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले, ‘अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, ही आमची पायवाट आहे. गेली 30 वर्षे शिवसेना आणि अयोध्या यांचे एक नाते निर्माण झालेले आहे. त्याच्यामुळे आम्हाला दौऱयासाठी फार तयारी करावी लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक किंवा शिवसेनेचा पदाधिकारी हा सतत अयोध्येत जात-येत आहे. मी स्वतः जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसतानाही जाऊन आले आणि मुख्यमंत्री झाल्यावरही जाऊन आले. आदित्य ठाकरे हेदेखील अनेकदा जाऊन आलेले आहेत, दर्शन घेऊन आले आहेत. कोविडच्या संपूर्ण कालखंडात काही निर्बंधांमुळे आम्हाला अयोध्येला जाता आले नाही. नाहीतर आमचा हा जाण्याचा कार्यक्रम तेव्हापासूनच ठरलेला आहे. आता यासंदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत. या चार-पाच दिवसांमध्ये दौऱयाची तारीख ठरवली जाईल. अयोध्येत शरयूच्या तीरावर जेव्हा एखादा कार्यक्रम करायचा असेल तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आमचे कार्यकर्ते त्यासाठी तिकडे गेलेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोण काय बोलतेय यावर आमचे दौरे ठरत नाहीत

आदित्य ठाकरे यांच्या दौऱयाविषयी विरोधकांकडून केलेल्या विधानाविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, ‘कोण काय बोलतेय आणि कोणाला काय बोलायचेय यावर आमचे दौरे ठरत नाहीत. अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिक होते. अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांचे बलिदान झालेले आहे आणि जर अशा प्रकारचे कोणी वक्तव्य करत असेल तर तो त्या आंदोलनाचा अपमान आहे आणि त्या बलिदानाचा अपमान आहे,’

शिवसेना आणि भीती याचा मेळ नाही

सरकार पडणार असल्याच्या तारखांमागून तारखा विरोधकांकडून दिल्या जात असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ‘50 वर्षे शिवसेना वादळांशीच संघर्ष करत इथपर्यंत पोहचलेली आहे. आम्हाला वादळं नवीन नाहीत, वादळं परतून लावण्याइतकी आणि नवीन वादळ निर्माण करण्याची क्षमता व ताकद महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त शिवसेनेमध्येच आहे. शिवसेना आणि भीती या दोन शब्दांचा कधी मेळ बसत नाही. भीती हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही,’ असे जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.