
सामना प्रतिनिधी । नागपूर
नागपूरमध्ये होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी नागपूर विधिमंडळाला भेट दिली. विधानसभेत हक्कभंगावरून शिवसेना आमदारांनी मांडलेली आक्रमक भूमिका तसेच विधान परिषदेत जनहिताच्या मुद्दय़ावरून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्दय़ावरील कामकाज पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी ‘महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न कसे सुटताहेत हे पाहण्यासाठी आलो’ असल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली.
शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी सकाळी ११ वाजताच विधिमंडळात पोहोचले. शिवसेना पक्ष कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार घातल्यानंतर ते विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी गॅलरीत पोहोचले. यावेळी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रांवर प्र-कुलगुरू नेमण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत होती. विधानसभा आणि परिषदेतील लक्षवेधी, प्रश्नोत्तरे, विरोधकांचा २९३ चा प्रस्ताव अशा कामकाजाची माहिती घेतल्यानंतर पक्ष कार्यालयात शिवसेना आमदारांशी त्यांनी संवाद साधला. पक्ष कार्यालयातील बैठकीला शिवसेनेचे सर्व आमदार तसेच मंत्रीही उपस्थित होते. त्याचप्रमाणे एमआयएमचे आमदार वारीस पठाण आणि इम्तियाज जलील यांच्यासह अन्य पक्षाच्या आमदारांनीही आदित्य ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याशी वार्तालाप केला.



























































