महिलांना २५०० रुपये, प्रदूषण, गरीब तरुण, प्रत्येक मुद्द्यावर विश्वासघात! आपचा भाजप सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम आदमी पक्षाने (AAP) दिल्लीतील भाजप सरकारच्या वर्षपूर्तीवर जोरदार टीका केली असून, हे सरकारला सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरवले, असल्याचे म्हटले आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत भाजप सरकारचा रिपोर्ट कार्ड सादर केला आणि भाजपची वर्षपूर्ती म्हणजे दिल्लीकरांची केवळ फसवणूक असल्याचे म्हटले.

या पत्रकार परिषदेत मनीष सिसोदिया यांच्यासोबत दिल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज आणि आमदार कुलदीप कुमार उपस्थित होते. यावेळी ‘एक साल, दिल्ली बेहाल, याद आ रहे केजरीवाल’ अशा आशयाचे फलक प्रदर्शित करण्यात आले. सिसोदिया यांनी भाजपला १५ प्रश्न विचारत महिला, तरुण, प्रदूषण आणि नागरी सुविधांच्या मुद्द्यावर घेरले.

निवडणुकीपूर्वी भाजपने दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र वर्ष उलटूनही एक पैसाही दिला नसल्याने ही महिलांची सर्वात मोठी फसवणूक असल्याचे सिसोदिया म्हणाले. याशिवाय दिल्लीतील प्रदूषण नियंत्रित करण्याऐवजी या सरकारने राजधानीला सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत नेऊन ठेवले आहे. यमुना स्वच्छतेच्या नावाखाली केवळ घोषणाबाजी झाली असून प्रत्यक्षात काहीच काम झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

रोजगाराच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात एक लाख तरुणांना नोकरीवरून काढण्यात आले असून ते आज बेरोजगार आहेत. गरिबांच्या घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर करण्यात आले आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे सामान्य जनता त्रस्त असताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपला एक वर्षाचा कार्यकाळ साजरा करत आहेत, हे दुर्दैवी असल्याचे आप नेत्यांनी म्हटले. दिल्लीतील शाळा, रुग्णालये आणि पाणीपुरवठा यांसारख्या केजरीवाल सरकारने उभ्या केलेल्या व्यवस्था भाजपने उद्धवस्त केल्या असून, आता जनतेला पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची गरज भासत असल्याचा दावा आपने केला आहे.