मलाही भाजपमध्ये सहभागी होण्याची ऑफर, आप नेत्या आतिशी यांचा आरोप

आम आदमी पार्टीचे अनेक महत्त्वाचे नेते सध्या कारागृहात आहेत. तपास यंत्रणा या राजकीय अजेंड्याला पुढे रेटत असल्याचा आरोप आप नेत्या आतिशी यांनी केला असून आपल्यालाही भाजपमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना आतिशी म्हणाल्या की, राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठी भाजपमध्ये सहभागी व्हावं लागेल अशी धमकी मिळत आहे. पुढील दोन महिन्यांत आपच्या आणखी चार नेत्यांवरही अटकेची कारवाई करण्याचं षडयंत्र ईडी करत आहे, असंही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आतिशी यांनी टीका केली. पंतप्रधान आणि भाजपने आम आदमी पार्टीला आणि त्याच्या नेत्यांना चिडण्याचा, नष्ट करण्याचा निश्चय केलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आपच्या आणखी काही नेत्यांना अटक होऊ शकते.