आंगणेवाडी यात्रा 17 फेब्रुवारीला

993

नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार सोमवार 17 फेब्रुवारी 2020 ही तारीख निश्चित झाली. आज (रविवार) 8 डिसेंबर रोजी आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडी मंडळाने याबाबत माहिती दिली.

यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या आदेशा नुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली. यात्रेची तारीख निश्चित झाल्याने आता चाकरमानी व भाविकामध्ये यात्रोत्सवात आंगणेवाडीत येण्यासाठी तिकीट बुकिंगची लगबग सुरू झाली आहे.

लाखो भक्तांना देवीच्या दर्शनाची अत्यंत सुलभ व्यवस्था करून आपल्या दर्जेदार नियोजनाचा आदर्श आंगणेवाडी मंडळाचा आहे. दरवर्षी गर्दीचे नवनवे उच्चांक गाठणाऱ्या यात्रोत्सवात यावर्षीही लाखो भाविक हजेरी लावतील, गर्दी अधिक वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंगणेवाडी मंडळ, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, तसेच तालुका व जिल्हा प्रशासन यात्रा नियोजन करण्यास सज्ज झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या