‘आप’ नगरसेवकाच्या इमारतीच्या छतावर पेट्रोलबॉम्ब, दगडांचा खच

1798

करावलनगर भागात राहणारे आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची अतिशय निर्दयपणे हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. ताहिर हुसेन यानेच अंकित यांची हत्या केल्याचा आरोप शर्मा कुटुंबाने केला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही ट्विट करून या हत्येला ताहिर हुसेनच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दयालपूर पोलिसांनी हुसेन विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दिल्लीच्या करावलनगर भागातील आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसेन यांच्या मालकीच्या पाच मजली इमारतीच्या छतावर पेट्रोलबॉम्ब, ऑसिडबॉम्ब, दगड-विटांचा खच तसेच गलोली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताहिर हुसेनला चौकशीसाठी पाचारण केले असून त्याने मात्र दंगलखोरांनी हुसकावून देत इमारतीचा ताबा घेतल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी हुसेनचे घर आणि फॅक्टरी सील केली आहे. करावलनगर येथील एका इमारतीच्या छतावरून दंगलखोरांनी दगड-विटांचा मारा केला, पेट्रोलबॉम्ब फेकल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यानंतर आज देशविदेशातील माध्यमांनी हुसेनच्या इमारतीची पाहणी केली.

त्याला उचलून तुरुंगात टाका – केजरीवाल

ताहिर हुसेनचा सहभाग उघडकीस आल्यानंतर केजरीवाल सरकारवर जोरदार टीका झाली. त्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘आप’चा कोणताही कार्यकर्ता हिंसाचारात दोषी असेल तर त्याला उचलून तुरुंगात टाका. किंबहुना त्याला दुप्पट शिक्षा द्या, अशी भूमिका मांडली. तसेच हुसेनची ‘आप’मधून हकालपट्टी केली आहे.

हिंसाचाराच्या चौकशीसाठी दोन एसआयटी

हिंसाचाराच्या चौकशीसाठी क्राईम बँचची दोन विशेष तपास पथके(एसआयटी) तयार केली आहेत. जॉय टिर्के आणि राजेश देव या डीसीपींच्या नेतृत्वाखाली ही पथके काम करणार असून अतिरिक्त पोलिस आयुक्त बी. के. सिंग यांचे नियंत्रण राहणार आहे. पथकांनी तत्काळ चौकशीची सूत्रे हाती घेतली आहेत.

व्हॉटस्ऍप ग्रुपचीही चौकशी

हिंसाचार भडकवणारे अनेक मेसेज व्हॉटस्ऍप ग्रुपवर व्हायरल झाले. भडकावू भाषणे, जाळपोळ, दगडफेकीचे प्लॅनिंग यावरही व्हॉटस्ऍपवर चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्हॉटस्ऍप ग्रुपची चौकशी सुरू केली असून अनेकांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. तसेच शेजारच्या राज्यांतून आलेल्या लोकांचीही चौकशी केली जात आहे.

निमलष्करी दलाच्या सुरक्षेत अंत्यसंस्कार

हिंसाचारादरम्यान गोळी लागून ठार झालेल्या 26 वर्षीय राहुल सोलंकीवर निमलष्करी दलाचे जवान आणि पोलिसांच्या हजेरीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतल्यापासून अंत्यसंस्कार होईपर्यंत संरक्षण पुरवण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. त्यानुसार राहुलच्या अंत्यसंस्कारासाठी संरक्षण पुरवण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या