‘आरे’ला हात लावाल तर खपवून घेणार नाही! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

2087

मेट्रो रेल्वेला आमचा अजिबात विरोध नाही. आरेच्या कारशेडसाठी इतर जागेचा पर्याय आहे. पण तरीही 2 हजार 700 झाडे तोडून कारशेडसाठी आरेच्या जंगलाचाच आग्रह कशाला? आरेमधील कारशेडला मुंबईकरांचा का विरोध आहे ते ऐकणे सरकारचे कर्तव्यच आहे. आरेचे जंगल वाचवून कारशेडचे बांधकाम जमत नसेल तर मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या अश्विनी भिडे यांची बदली करून त्यांच्या जागी मुंबईवर प्रेम करणारा अधिकारी नियुक्त करावा. पण आरेच्या जंगलाला हात लावाल तर आम्ही सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

जगातील दुर्मिळ मांजर आरेमध्ये

मेट्रो-3 प्रकल्पासाठी आरे कारशेड उभारणे सोयीचे आहे. कारशेड अन्यत्र हलवावी लागली तर हा प्रकल्पच पूर्ण होऊ शकत नाही असा युक्तिवाद मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी केला आहे. 2 हजार 700 झाडे तोडून कारशेड उभारण्यास लोकांचा विरोध असताना चार वर्षे तुम्ही त्यावर काही न बोलता 24 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आखता अखेरच्या क्षणी आरेशिवाय अन्यत्र कारशेड शक्य नाही असे का सांगता, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.

पर्यावरणप्रेमी म्हणून पत्रकार परिषद

या पत्रकार परिषदेच्या सुरवातीलाच भूमिका स्पष्ट करता आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेना भवनात पत्रकार परिषद असली तरी ही पत्रकार परिषद राजकीय नसून एक मुंबईकर व पर्यावरणप्रेमी म्हणून घेत आहे. आरेशिवाय कारशेड होऊ शकत नाही अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेला वन्य जीव अभ्यासक नयन खानोलकर तसेच राजेश सानप व पर्यावरणप्रेमी झोरु भातेना उपस्थित होते.

संवादाने प्रश्न सोडवा

पर्यावरणप्रेमींचा विरोध डावलून मुंबईवर मनमानी होत आहे. मुंबई विरोधात एमएमआरसीएल असे चित्र दुर्दैवाने निर्माण होत आहे हे योग्य नाही. एमएमआरडीए व एमएमआरसीएल मुंबईत कामे करीत आहे. एमएमआरडीच्या लाइनवर कुठेही कोणालाही त्रास झालेला नाही. एमएमआरडीएसोबत नेहमी संवाद झाला आहे. काही वाद झाले असतील तर ते संवादाने मिटवले आहेत. पण एमएमआरडीएलची लाइन आहे त्या ठिकाणी अगदी पारशी समाजाच्या फायर टेंपलपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. गिरगावमध्ये मेट्रोचे काम सुरू होते त्या ठिकाणी पुनर्वसनाच्या मुद्दय़ावरून शिवसेनेला काम थांबवावे लागले. तेव्हा एमएमआरसीएलने लोकांशी संवाद साधला आणि मग लोकांना घरे मिळाल्यावर काम सुरू झाले याची आठवण आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने करून दिली.

तांत्रिक व यांत्रिक चर्चा

आम्ही काही उगाचाच विरोध करायला निघालेलो नाहीत. एमएमआरसीएल कुठेही जैवविविधतेबद्दल बोलत नाही. सर्व चर्चा तांत्रिक व यांत्रिकी चर्चा सुरू आहे. आरेमधील बिबटे, अजगर, विंचू फुलपाखरे यावर कोणीही बोलत नाही. आरेबाबत खोटे चित्र एमएमआरसीएल निर्माण करीत आहे, पण वस्तुस्थितीवर कोणी बोलत नाही. आम्ही इतर कोणत्याही प्रकल्पाला विरोध केला नाही. आरे कारशेडला विरोध करीत आहोत. कारण या जंगलात जैवविविधता आहे.

आरेचा घोटाळा

आरेसाठी जे कोणी सल्लागार आहेत. त्यांनी सल्ला देण्याचे किती पैसे घेतले. एमएमआरसीएसने सांगितले की, आरेमध्ये कारशेड झाली नाही तर मेट्रो शक्य नाही. तर मग हा घोटाळा आहे का? असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

वन्य जीवांना माहुलला स्थलांतरित करणार का?

या जैवविविधतेला आरेच्या जंगालातून पळवायचे असेल किंवा घालवायचे असले तर भविष्यात एमएमआरसीएल या जंगलातील बिबटय़ांना व वन्य जिवांना माहुलला स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करील, अशी उपरोधिक टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

मुंबईवर प्रेम करणारा अधिकारी नेमा

अश्विनी भिडे यांच्यावर आमचा राग नाही असे स्पष्ट करीत आदित्य ठाकरे म्हणाले की, या अधिकाऱ्यांना हे काम जमत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईवर प्रेम असणाऱ्या अधिकाऱ्याला नेमावे, मुंबईकरांचे ऐकून पुढे जाईल अशा अधिकाऱ्याला नेमावे. कोणतीही एजन्सी मुंबई किंवा महाराष्ट्रात एवढय़ा मनमानीपणे काम करीत नव्हती. त्यामुळे आरेला हात लावाल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

कांजुरमार्गला डेपो करा

पर्यावरणाचे अभ्यासक व पर्यावरणप्रेमी झोरू भातेना या पत्रकार परिषदेत म्हणाले की, आरेसाठी सरकारने सहा जणांची तांत्रिक समिती स्थापन केली. त्यात मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजोय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त, प्रधान सचिव व दिल्ली मेट्रोचे अधिकारी व दोन पर्यावरणतज्ञांचा समावेश होता. सहाही जणांनी आरेमध्ये मेट्रो कारडेपो नको अशी शिफारस 2015 मध्ये केली होती.  कांजुरमार्गला डेपो करा कशी सूचना केली होती. पण त्यात एक अट टाकली की कांजुरमार्गला जागा मिळाली नाही तरच आरेला जा. पण आरेला वाचवण्यासाठी या सर्वांनी प्राधान्य दिले होते याची आठवण भातेना यांनी यानिमित्ताने करून दिली. आता सरकार म्हणते की कांजुरमार्ग मिळत नाही कारण कोर्टाचे काही प्रकरण आहे, पण ते चुकीचे आहे कारण ती जागा सरकारचीच आहे. त्या जागेवर कोणाचाही दावा नाही, असेही ते म्हणाले.

मेट्रोला अजिबात विरोध नाही

कोणत्याही राजकीय हेतूने मेट्रोला विरोध नाही. मेट्रो आम्हाला सर्वांनाच हवी आहे. मेट्रोतून मीसुद्धा प्रवास करतो. मेट्रोची कामे सुरू आहेत त्या ठिकाणीही आम्ही विरोध केलेला नाही. मेट्रोची कामे सुरू असताना पाण्याचे पाइप, विजेच्या वायर आदी तुटल्या पण आम्ही मेट्रोला सांभाळून घेतले. पण आरेमध्ये जंगल नाही असे चित्र मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसीएल) दाखवले जात आहे. आरे वसाहतीमध्ये जैवविविधता असताना मग आरे कारे, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला.

…म्हणून ‘आरे’ला ‘कारे’

आरेमध्ये जंगल नाही असे चित्र एमएमआरसीएल दाखवत आहे.

आमचा कोणत्याही

प्रकल्पाला विरोध  नाही;

आरे कारशेडला आहे.

कारण या जंगलात

जैवविविधता आहे.

एमएमआरसीएल कुठेही जैवविविधतेबद्दल बोलत नाही.

सर्व तांत्रिक व यांत्रिकी चर्चा सुरू आहे. आरेमधील बिबटे, अजगर, विंचू, फुलपाखरे यावर कोणीही बोलत नाही.

कारशेडसाठी सुरुवातीपासून बेस्टचा बॅकबे डेपोचा किंवा ओशिवरा डेपोचा पर्याय आहे. कांजुरमार्गची जमीन मेट्रो-6 साठी चालते. मग  मेट्रो-3 साठी का चालत नाही?

मेट्रोसाठी आरेमध्येच आम्हाला जागा हवी ही दादागिरी सुरू आहे. जर ही कारशेड नसेल तर मेट्रो होणारच नाही हा कदाचित कोर्टाला धमकी देण्याचा प्रकार सुरू असेल, अशी शंका आहे.

विरोध का आहे हे ऐकणे सरकारचे कर्तव्य

आमच्याकडेही पर्यावरणाचे अभ्यासक आहेत. त्यांनीही अभ्यास केला आहे. जास्त लोकांचा पाठिंबा किंवा कमी लोकांचा पाठिंबा असेल हा मुद्दाच नाही. एका माणसाचा विरोध असेल तरी विरोध का आहे ते ऐकण्याचे सरकारचे कर्तव्य आहे. संवाद असणे गरजेचे आहे. कारशेडला विरोध करणारे मेट्रोला विरोध करतात असे चित्र निर्माण केले जात आहे. हा केवळ 2 हजार 700 झाडांपुरता मर्यादित विषय नाही तर जैवविविधतेचा विषय आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ल्युना आणि तिचे वंशज पक्के मुंबईकर

आपली प्रतिक्रिया द्या