अवती भवती – जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना

>> अभय मिरजकर

जल व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना जल व्यवस्थापन हा स्वतंत्र विषय आहे, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पुरातन काळापासून जल व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलेले दिसून येते. मराठवाडय़ातील बीड शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असणारी खजाना विहीर अशीच एक जल व्यवस्थापनाची उत्कृष्ट कलाकृती आहे.

अहिल्या नगरच्या निजामशाही कालखंडात मुर्तुजा शाह निजामच्या शासन काळात सलाबत खानने 1582 मध्ये राजा भास्कर या वास्तू व भूजल शास्त्रज्ञाच्या मदतीने खजिना विहीर बांधली. ही विहीर म्हणजे भूगर्भातील जलस्रोत शोधण्याच्या तत्कालिक प्रगत विज्ञानाचा ठोस पुरावाच आहे. त्या काळातील जलसिंचन पद्धत, जलस्रोतांच्या संशोधनाची पद्धत व जलसाठा पद्धत किती प्रगत होती याची प्रचीती येते.

केवळ 23.5 फूट खोल असणाऱया या विहिरीचे पाणी कोणतेही उपकरण न वापरता 4 कि.मी. दूर अंतरावर असणाऱया शेतात जमीन स्तरावर येते. कोणतेही उपकरण न वापरता नैसर्गिक पद्धतीने विहिरीतले हे पाणी 23.5 फूट वर कसे आले असेल त्याचे तंत्रज्ञान काय असेल हे आश्चर्य आहे. या विहिरीचे पाणी आटत नाही. कायम चार फूट पाणी असते. विहिरीला तीन मोठे बोगदे ( उर्दूत त्याला नहर म्हणतात.) आहेत. ते 5 फूट उंच व 2.5 फूट रुंद आहेत. विहिरीचा एक बोगदा नैऋत्य दिशेला, दुसरा आग्नेय, तर तिसरा उत्तर दिशेला आहे. 8140 फूट लांबीचे दोन बोगदे शेवटी बंद आहेत, तर उत्तरेकडील एक बोगदा तब्बल चार किमी अंतरावर उघडतो आणि तब्बल 500 एकर शेत जमीन भिजवतो. विशेष म्हणजे नदीच्या पात्राच्या 20 फूट खालून तो गेलेला आहे.

भूगोल आणि स्थापत्य शास्त्र यांचा सुंदर मिलाफ येथे आढळतो. बीड शहरातील पाणीटंचाई दूर करण्याचे काम या खजाना विहिरीच्या माध्यमातून झालेले आहे. खापरी पाइपलाईनच्या माध्यमातून पाणी वाहून नेऊन कारंजे निर्माण करण्यात आले होते. मुख्य बोगद्यातून वाहणाऱया पाण्यास हवा व सूर्यप्रकाश मिळावा किंवा प्रवाहात जर काही अडथळा आला तर तो दूर करता यावा या उद्देशाने विशिष्ट अंतरावर या बोगद्याला झरोके करण्यात आले आहेत. हा केवळ ऐतिहासिक ठेवा म्हणून जपणे आवश्यक नाही, तर जल व्यवस्थापन शास्त्र समजून घेण्यासाठी हा ठेवा महत्त्वपूर्ण आहे.