अभय योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ; एकरकमी प्रलंबित पाणी बिल भरण्याची अट शिथिल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाण्याच्या प्रलंबित बिलावर अतिरिक्त पैसे भरण्यापासून विशेष सूट देणाऱया अभय योजनेला मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेऊन पालिकेने आता या योजनेला 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर एकरकमी सर्व प्रलंबित पाणी बिलांचे पैसे भरण्याची अट शिथिल करण्यात आली असून प्रत्येक बिलानुसार पैसे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे रहिवाशांनी योजनेचा लाभ घेऊन प्रलंबित पाणी बिलांचे पैसे भरावेत असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याआधी अभय योजनेला 30 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मुंबई महानगरपालिका दररोज सवा कोटीपेक्षा अधिक रहिवाशांना सरासरी 3 हजार 850 दशलक्ष लिटर (385 कोटी लिटर) पिण्याचे पाणी पुरवते. देशातील सर्वात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरवणारी महानगरपालिका असा मुंबई महानगरपालिकेचा लौकिक आहे. पाणीपुरवठा नियमितपणे व्हावा याकरिता रहिवाशांनी त्यांची बिले एका महिन्यात भरणे बंधनकारक आहे तसेच एक महिन्याच्या आत बिलाचे पैसे न भरल्यास त्यावर अतिरिक्त पैसे दंड म्हणून आकारले जातात. बिलाच्या रकमेवर साधारणपणे दर महिन्याला दोन टक्के यानुसार ही आकारणी केली जाते. या अतिरिक्त आकारणीबाबत जलजोडणीधारकांना विशेष सूट देण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली आहे. याआधी प्रलंबित जल बिलातील जल आकार, मलनिस्सारण आकार आणि जलमापक भाडे यांचे एकरकमी पैसे भरून अभय योजनेचा लाभ घेता येत होता. मात्र, आता सर्व प्रलंबित बिले एकरकमी भरण्याऐवजी प्रत्येक बिलानुसार ग्राहकांना पैसे भरूनही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी पालिकेच्या जल अभियंता खात्यातील सहायक अभियंता (जल कामे) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.