रंगपट – असाही एक नाटय़रसिक…!

एका नाटकाच्या प्रयोगातल्या अनुभवाविषयी सांगत आहे, अभिनेता व दिग्दर्शक अभिजित झुंझारराव…

रसिकांना चांगले ते दिले की, ते स्वीकारणारा रसिक नाटकाला मिळतोच. याचा अनुभव मला एका प्रयोगात प्रकर्षाने आला. मी दिग्दर्शित केलेल्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ या नाटकाचा प्रयोग होता. पहिला अंक संपला होता आणि दुसऱया अंकातल्या नेपथ्य बदलाचे काम सुरू होते. तितक्यात एक व्यक्ती आत आली. लोकांना नाटक आवडले की, ते पहिला अंक संपताच भेटायला येतात. नाटकाबद्दल भरभरून बोलतात आणि दुसऱया अंकाबद्दल उत्सुकता दाखवत पुन्हा प्रेक्षागृहात जाऊन बसतात, पण त्यादिवशी भेटायला आलेली व्यक्ती आमच्या सरावाचे प्रश्न घेऊन आलीच नव्हती.

मला भेटायला आलेल्या त्या व्यक्तीचा पहिलाच प्रश्न होता, ‘‘काय हो, किती पैसे दिलेत आयोजकांनी तुम्हाला नाटक सादर करण्यासाठी?’’ मला हा प्रश्न अनपेक्षित होता. मला वाटले बहुधा त्यांना नाटक आवडलेले नाही. त्यांनी माझी अवस्था ओळखली आणि ते म्हणाले, ‘‘तुम्ही संकोच करू नका. छान रंगले आहे नाटक. काय आहे की, अशा पद्धतीची नाटके करायची तर पैसे उभे करणे जिकिरीचे असते. तुम्हाला पुरेसे पैसे मिळाले आहेत का? कारण आयोजकांनी नाटक विनामूल्य ठेवले आहे.’’ मी म्हटले, ‘‘हो, अगदीच आमच्या अंगावर प्रयोग पडत नाही. जाण्या-येण्याचा खर्च मिळून पुढच्या प्रयोगांना लागणारी रक्कम निघेल एवढे दिले आहेत.’’ त्यांनी पुन्हा थेट प्रश्न केला, ‘‘आकडा सांगा.’’ मला वाटले की, त्यांना कुठेतरी नाटकाचा प्रयोग हवा असेल. कारण आतापर्यंत आमचे जे काही थोडे प्रयोग झाले होते, ते असेच ‘एकातून दुसरा’ या तत्त्वावर झाले होते. मी त्यांना म्हटले, ‘‘तुम्ही सांगाल त्या बजेटमध्ये आम्ही प्रयत्न करू प्रयोग करायचा. आमचा प्रवास खर्च, प्रयोगाच्या दिवशीचे जेवण, राहायची वेळ आलीच तर तशी सोय, इतकेच. या सगळय़ातून आयोजकांना परवडेल तर वरची थोडीफार रक्कम. अर्थात, आग्रह अजिबात नाही.’’ यावर ते काका निघून गेले.

प्रयोग संपताच ते काका पुन्हा आमच्यासमोर हजर झाले, पण या वेळी ते काही जणांना सोबत घेऊन ते आले होते. त्या काकांनी माझ्या हातात एक पुडके दिले आणि म्हणाले, ‘‘हे काही रुपये आहेत, ते ठेवा.’’ आम्हाला सुचेना की काय प्रतिक्रिया द्यावी. एकीकडे अप्रूपही वाटत होते आणि संकोचही! तितक्यात आयोजकांपैकी एक जण पुढे आले. त्यांच्याकडून आम्हाला कळले ते असे की, ते काका मध्यांतरात आयोजकांकडे गेले होते आणि प्रेक्षकांना आवाहन करून जमतील तेवढे पैसे या पोरांना देऊ या, असे काकांनी त्यांना सुचवले होते. त्या वेळी आयोजकांनी, ‘‘यातून चुकीचा संदेश जाईल. त्यापेक्षा तुम्ही स्वतः लोकांमध्ये जाऊन जेवढे जमवता येतील तेवढे पैसे जमवा आणि स्वखूशीने त्यांना द्या,’’ असे काकांना सांगितले होते. यानंतर ते आयोजक आम्हाला म्हणाले, ‘‘काकांसोबत आलेली जी मंडळी होती, त्यांनी मिळून ही रक्कम जमवली आणि तुम्हाला दिली आहे.’’ हे सर्व ऐकून खूपच कौतुक वाटले आम्हाला त्या काकांचे! त्यांनी आम्हाला पैसे दिले म्हणून नाही, तर असाही एक रसिक प्रेक्षक असू शकतो, जो नाटक केवळ बघतच नाही तर त्याचे रसग्रहण करून योग्य ते मूल्यमापनही करत असतो.

गेल्या वीस वर्षांत ‘अभिनय कल्याण’ या आमच्या संस्थेने असा प्रेक्षक कमावला आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशभरात असे असंख्य प्रेक्षक निर्माण होत आहेत, याचा आनंद आहे. हे सर्व ठीक आहे, पण काही ठिकाणी तर आम्हाला असे अनुभव आले आहेत की, त्याविषयी न बोललेलेच बरे! लोकांची सतत ये-जा, खुर्च्यांचा आवाज, प्रयोग सुरू असताना फोनवर किंवा आपापसांत बोलणे, सांगूनही मोबाइल सायलेंट मोडवर न टाकणे अशी एक ना हजार कारणे असतात प्रयोग पडायला अथवा रंगायला. प्रेक्षकांत आणि नाटकात एकाग्रता निर्माण होण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एकीकडे असा प्रेक्षक असतो, तर दुसरीकडे त्या काकांसारखे रसिक! अशा रसिकांना खरेच कडकडीत सलाम करावासा वाटतो. चांगला रसिक असतोच नाटकाला, पण तो फार कमी वेळा लाभतो. तो सातत्याने लाभावा. अशा असंख्य चांगुलपणाच्या खुणा पेरत नाटक खेळण्यात खरी मजा आहे.

शब्दांकन – राज चिंचणकर