स्वस्थ आहारपद्धती

>>प्रगती करंबेळकर

शरीराची महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. शरीराला पोषक घटक गरजेचे असतात. पण त्यांचे सेवन करण्याची पद्धतीही व्यवस्थित असायला हवी. स्वस्थ आहारपद्धती आणि आहाराच्या पंचमार्गाविषयी आहारतज्ञ आणि होमिओपथी डॉ. वैशाली जोशी यांनी केलेले मार्गदर्शन.

सकस आहार करा ः सकस आहार म्हणजे पौष्टिक आहार जो आपल्या शरीराला स्वस्थ ठेवतो. आहारतज्ञ आणि होमिओपथी डॉक्टर वैशाली जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरासाठी पोषक घटक म्हणजे चरबी, प्रथिने, जीवनसत्त्व, खनिजे आणि कर्बोदकेही रोजच्या आहारात असणे गरजेचे असते. पोषके चपाती, भाजी, वरण, भात इतर आहारांतून आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. पौष्टिक जेवण शरीराचे कार्य आणि उर्जा टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्त्वे पुरवतात. पौष्टिक घटक खाताना ते ताजे अन्न असणे आवश्यक असते. डॉ वैशालींच्या मते पॅकेज फूड, रेडी टू इट, प्रोसेस फूड आणि तेलकट अन्न हे शरीराला हानिकारक असते. कारण त्यात मैदा, वनस्पती तेल, जास्त प्रमाणात साखर आदींचा समवेश असतो.

लक्षपूर्वक जेवणे ः लक्ष देऊन जेवणे गरजेचे असते. कारण मध्ये व्यत्यय असल्यास आपण किती खात आहोत याचे भानच आपल्याला नसते. मग कधी जास्त आहार होतो तर कधी कमी. यामुळे लक्षपूर्वक आहार करणे हे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही लक्ष देऊन खाल तेव्हा शरीरात पाचक रस निर्माण होण्यास मदत होईल. यामुळे जेवण पचायला मदत होते. यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला तर मदत होतेच, शिवाय अतिरिक्त खाणे टाळता येते, पचन सुधारते आणि मानसिक स्वास्थ्यदेखील उत्तम राहते.

जेवताना पाणी पिण्याचे प्रमाण ः बरेच जण जेवताना पाणी पिऊ नये किंवा जेवणाच्या मध्ये पाणी पिणे पचन क्षमतेसाठी धोकादायक असते असा सल्ला देतात. डॉ. वैशाली जोशी या म्हणतात ‘जेवताना एक-दोन घोट पाणी पिण्यास काही हरकत नसते. पाणी हे अन्न पचवण्यास मदत करते. खासकरून ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी जेवणाआधी पाणी प्यायल्यास जेवण कमी जाऊन वजन कमी होण्यास मदत होते.’ पाणी पिण्यामुळे पोटातील आम्ल आणि पाचक एंजाइम पातळ होतात, ते पचविणे सोपे असते.

अन्न चावून खाणे ः लहानपणी 32 वेळा अन्न चावून खावा असे आपण वडीलधाऱयांकडून ऐकलेले असते. घास कितीवेळा चावून खायचा हे महत्त्वाचा नसून घास नीट चावून खाणे महत्त्वाचे आहे.

जेवताना इतर व्यत्यय टाळा ः हल्ली टीव्ही, मोबाईल, संगणक अशी यंत्र आल्याने जेवताना सगळे लक्ष या यंत्रावर असते. टीव्ही, संगणक, मोबाईल या यंत्रामुळे जेवणाकडून लक्ष विचलित होऊन आपण किती आणि काय खात आहोत हे आपल्याला कळतच नाही. लहान मुले तर यामुळे जेवतच नाहीत. मग त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. पचनक्रिया आणि पोषक तत्त्वांची कमतरता अशा समस्या निर्माण होतात.