
परदेशात एमबीबीएसची डिग्री मिळवणारे हिंदुस्थानी विद्यार्थी मायदेशी परतल्यावर येथील साधी क्रीनिंग टेस्ट पास होऊ शकत नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. लाखो रुपये खर्चून पाच-सहा वर्षे हे विद्यार्थी परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेतात ते शिक्षण हिंदुस्थानात कुचकामी ठरू लागल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या सात वर्षांत जवळपास 84 टक्के विद्यार्थी डॉक्टरकी सुरू करण्याआधीची टेस्ट नापास झाल्याचे उजेडात आले आहे.
एमबीबीएसची डिग्री मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. अशा परिस्थितीत ते परदेशाचा रस्ता धरतात. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानातील हजारो विद्यार्थ्यांनी एमबीबीएससाठी परदेशी विद्यापीठ गाठले. तेथे जाऊन टय़ूशन तसेच निवास व्यवस्थेवर लाखो रुपये खर्च केले. मुलाला डॉक्टर बनल्याचे पाहण्यासाठी पालकही खर्चाच्या बाबतीत आपला हात सैल सोडत आहेत. मात्र हिंदुस्थानात परतलेल्या मुलांचा क्रीनिंग टेस्टचा निकाल पाहून पालकांची घोर निराशा होत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 29 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबरच्या चर्चेवेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीचा स्वीकार केला.
परदेशी विद्यापीठांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
ही परिस्थिती उद्भवण्यास परदेशी विद्यापीठेच जबाबदार आहेत असा दावा केंद्र सरकारने केला आहे. ही विद्यापीठे हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची योग्य पडताळणी करीत नसल्यामुळेच हे विद्यार्थी क्रीनिंग टेस्टमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करू शकत नाहीत असे सरकारने म्हटले आहे.
हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांतून एमबीबीएसचा कोर्स पूर्ण करण्यास कायद्याने मुभा आहे, मात्र हिंदुस्थानात प्रॅक्टिस सुरू करण्याआधी त्यांनी राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून घेतली जाणारी ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन’ ही परीक्षा पास होणे बंधनकारक आहे.

























































