पंतप्रधानांच्या मतदारसंघातही अस्वच्छता आहे; देशाची प्रगती झालीच नाही : अबू आझमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

सत्तेवर येताना अनेक आश्‍वासने भाजपने दिली होती. स्वच्छतेचा नारा पंतप्रधानांनी दिला. मात्र, पंतप्रधानांच्या मतदारसंघातही अस्वच्छता आहे. त्या गावाचीही प्रगती झाली नाही, सर्वत्र भ्रष्टाचार वाढला, महागाई वाढली,गंगा स्वच्छ झाली नाही, नोटा बंदीमुळे पाच कोटी लोक बेघर झाले, देशांमधला दहशतवाद कमी झाला का असा सवाल करून आता या सरकारला खाली खेचावे लागेल असा इशारा समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मगंळवारी येथे दिला. भाजपवाले जे लिहून देतात, तेवढेच एमआयएमवाले बोलतात असा आरोप त्यांनी औवेसी यांच्या एमआयएमवर केला. भाजप आणि एमआयएमची मिलीभगत असल्याचेही ते म्हणाले. नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते आले होते.

सत्तेत येताना भाजपने दिलेली आश्‍वासने पाळली नाही. त्यामुळे आता राज्यात आणि देशात भाजपला सत्तेपासून दूर केले पाहिजे असे ते म्हणाले. समाजवादी पक्षाची ताकद महाराष्ट्रामध्ये निश्‍चित कमी असेल. मात्र आम्ही उत्तर प्रदेशमध्ये भाजपला पुढे जाऊ देणार नाही असा दावा करुन आम्ही भाजपला दहापेक्षा जास्त जागा जिंकू देणार नाही अशा विश्वास त्यांनी व्यक्तकेला. देशात व राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. गरीब गरीबच राहिला आहे, तर श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. हे सरकार व्यापार्‍यांचे आहे. श्रीमंतांचे सरकार आहे. येथे रिलायन्सवाले भाजी पण विकतात आणि विमाने विकतात अशी परिस्थिती असल्याची टीका आझमी यांनी करुन गरीबांचे उद्योगधंदे बंद सरकराने बंद केल्याचा आरोप केला. देशामध्ये स्वच्छता अभियान राबवले. प्रत्येक खासदारांनी गाव दत्तक घेतले पण त्याचा आढावा घेतल्यावर आजही स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदार संघातील गावाची परिस्थितीही आहे असेही ते म्हणाले. इतर दंशांशी असलेले संबंध बिघडल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे. दोन समाजात तेढ वाढवणारा मुद्दा पुन्हा घेण्यात आला आहे. मंदिर तोडून मशीद व्हावी, हे सुद्धा इस्लामला कबूल नाही. याप्रश्‍नांचे राजकारण करता कामा नये, अयोध्येचा प्रश्‍न न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.न्यायालयाचा निर्णय येऊ द्या, असेही ते म्हणाले. भाजपचे विचार राष्ट्रीय स्वंयसंघाचे विचार आहेत. अयोध्याला जाऊन आता नवीन संविधान लिहीत आहे का ? असा सवालही त्यांनी केला. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिज, याबद्दल दुमत नाही मात्र आरक्षण देताना कायदाही मंजूर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

एमआयएम व भाजप हे एकच आहे. भाजपवाले लिहून देतात तेवढेच एमआयएमवाले बोलतात. त्यांची दोघांची मिलीभगत आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये रोजीरोटी मिळते म्हणून परराज्यातील लोक येथे योतात.आपल्या राज्यातील अनेकजण बाहेर उद्योगात, नोकरीत आहेत. त्यामुळे प्रांतीय तेढ वाढवणे अयोग्य असल्याचे ते म्हणाले.