
भाजपमध्ये गेल्यामुळे आपल्याला शांत आणि सुखाची झोप लागते असे म्हणणारे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आता झोप उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्याने त्यांना जाहीर शिवीगाळ केल्यानंतर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून संरक्षणाची मागणी केली आहे. माझ्या जिवाला धोका आहे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घाला, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
काँग्रेसमधून भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी राज्यात आणि देशात होत असलेल्या ईडी, सीबीआयच्या विरोधकांवर होत असलेल्या कारवायांचा उल्लेख करून आपल्याला भाजपमध्ये गेल्यामुळे शांत झोप लागते असे वक्तव्य केले होते. दोन दिवसांपूर्वी इंदापुरातील एका कार्यक्रमात अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्यावर शिव्यांची लाखोली वाहिली. आता मित्र पक्षाकडूनच होणाऱया शाब्दिक हल्ल्यांमुळे हर्षवर्धन पाटील बेजार झाले आहेत. त्यांची शांत झोप उडाली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात नाव न घेता अजित पवार गटाचा उल्लेख केला आहे. ‘मित्र पक्षाकडून माझ्या जीविताला धोका आहे. आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या पत्राचा रोख हा अजित पवार गटाचे आमदार दत्ता भरणे यांच्याकडे आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवार गटाच्या विरोधात थेट भूमिका घेत गेली पंधरा वर्षे फसवणूक केल्याचा आरोप केला होता.



























































