ऍपवर धावतेय ‘मरे’ची एसी लोकल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सुरू होऊन दीड-दोन वर्षे होत आली, परंतु मध्य रेल्वेच्या एसी लोकलचा अजून काही पत्ता नसला तरी मुंबईकरांच्या मोबाईल ऍपवर मात्र मध्य रेल्वेची एसी लोकल धावत आहे. कारण या लोकप्रिय ऍपवर मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांदरम्यानचे एसी लोकलचे दर प्रसिद्ध करण्यात आल्याने मुंबईत नव्याने आलेले प्रवासी बुचकळ्यात सापडत आहेत.

पश्चिम रेल्वेची एसी लोकल धावून जुनी होत आली तरी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास म्हणजे अद्याप मृगजळच ठरले आहे. मात्र रेल्वेच्या प्रवाशांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘एम-इंडिकेटर मोबाईल ऍप’वर गेली दोन वर्षे एसी लोकलचे भाडे सामान्य लोकलच्या भाड्याच्या बाजूला दर्शविण्यात येत असल्याने मुंबईकर बुचकळ्यात सापडत आहेत. 25 डिसेंबर 2017 पासून पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलचा प्रवास सुरू झाला आहे. चर्चगेट ते विरार एसी लोकलच्या दररोज 12 फेर्‍या होत आहेत. यानंतर दोन एसी लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाल्या असल्या तरी त्यातील एकही मध्य रेल्वेच्या नशिबी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्य रेल्वेची एसी लोकल आता ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात येईल असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘मरे’चे एसी भाडे ऍपवरून काढणार

मध्य रेल्वेवर एसी लोकल नाही आणि भाडे कसे दिसतेय असे विचारले असता या ऍपचे संस्थापक सचिन टेके यांनी हे एसी लोकलचे हे भाडे रेल्वे बोर्डाने ज्यावेळी भाडेरचना जाहीर केले होते त्यावेळीच ऍपवर टाकले होते. आता ते काढून टाकण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.