पारंपरिक की डिजिटल? ऑस्कर पुरस्कार सोहळय़ावर प्रश्नचिन्ह

लॉस एंजेलिस येथे 25 एप्रिल 2021 रोजी होणाऱया ऑस्कर अॅवॉर्ड सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संभ्रमावस्था दिसत आहेत. यंदाचा सोहळा आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल) करायचा की पारंपरिक पद्धतीने लाईव्ह करायचा यावर अजून निर्णय झालेला नाही. कोरोनामुळे ऑस्कर सोहळ्याचे आयोजन तसेही दोन महिने उशिरा होत आहे.

लवकरच थिएटर सुरू होतील आणि जे सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होतील, ते ऑस्करच्या स्पर्धेत उतरतील. त्यामुळे स्पर्धेत आणखी सिनेमांची टक्कर बघायला मिळेल, अशी आयोजकांना आशा आहे. त्यामुळे सध्या तरी ऑस्कर सोहळ्याबद्दल ठोस काही सांगता येणार नाही.

अॅकॅडमी ऑफ मोशन आर्टस् अॅण्ड सायन्स या संस्थेतर्फे प्रतिष्ठेचे ऑस्कर पुरस्कार दिले जातात. पुढील वर्षीचा सोहळा लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमधून लाईव्ह टेलिकास्ट करण्याच्या प्रयत्नात आयोजक आहेत. मात्र अद्याप यावर काहीच अंतिम निर्णय झालेला नाही.

3400 सीटस् असलेल्या थिएटरमध्ये लाईव्ह इव्हेंटला किती लोकांना उपस्थित राहण्यास अनुमती दिली जाईल, याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. अर्थात पुढच्या वर्षापर्यंत कोरोना आटोक्यात आला नाही, तर लाईव्ह सोहळ्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची शक्यताही हॉलिवूडमधून व्यक्त होत आहे.  

हिंदुस्थानच्या दोन कलाकृतीना नामांकन

ऑस्करच्या शर्यतीत हिंदुस्थानातून दोन कलाकृतीचे नामांकन झाले आहे. विदेशी भाषा श्रेणीत मल्याळम सिनेमा ’जलिकट्टू’ आणि लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत ’शेमलेस’ यांची निवड झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या