प्राचार्यांकडून ९ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या माजी विद्यार्थीनीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घरी बोलावून मित्राच्या साथीने त्यांना मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्यासमवेत अश्लील व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत ९ लाख रुपयांची खंडणी उकळली. हा धक्कादायक प्रकार तळेगाव-दाभाडे येथे उघडकीस आला. या गुन्ह्यातील फिर्यादी प्राचार्य व आरोपी विद्यार्थिनी तसेच तिच्या मित्राचे नाव पोलिसांनी जाहीर केले नाही. त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव-दाभाडे येथील एका महाविद्यालयात सापळा रचून जेरबंद केले.

फिर्यादी हे तळेगाव-दाभाडे येथील एका महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत तर आरोपी ही या महाविद्यालयातील माजी विद्यार्थिनी आहे. १ जून २०१८ रोजी तिने प्राचार्याशी संपर्क साधला. ‘आपले महत्त्वाचे काम आहे’ असे सांगून त्यांना घरी बोलावले. त्यानुसार ते घरी गेले. तेथे आरोपी विद्यार्थिनीने आपल्या मित्राशी संगनमत करून त्यांना घरात कोंडून मारहाण व शिवीगाळ केली. त्यांना अंगावरील कपडे काढायला भाग पाडले. त्यानंतर स्वत:सोबत अश्लील व्हिडीओ मोबाइलमध्ये काढून घेतला. तो व्हिडीओ त्यांच्या मित्र, नातेवाईंकांना सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकी देत ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यापैकी ९ लाख रुपये खंडणी त्यांनी आरोपींना दिली. उर्वरित २१ लाख रुपये देण्यासाठी पुन्हा धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी गुरुवारी महाविद्यालयात उर्वरित रक्कम स्वीकारण्यासाठी येणार असल्याचे प्राचार्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कळविले. त्यानुसार, महाविद्यालयात सापळा रचून दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले. खंडणीपोटी घेतलेल्या ९ लाख रुपयांपैकी ६ लाख २० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. तळेगाव – दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.