अजित पवार यांना अमरावती सिंचन घोटाळय़ातही एसीबीची क्लीन चिट

1485

राष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबीने) नागपूरनंतर आता अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही क्लीन चिट दिली आहे. यात त्यांची भूमिका नाही, असे एसीबी अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवर यांनी शपथपत्रात म्हटले आहे. क्लीन चिट दिल्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱयांवर ढकलण्यात आली आहे. नियमानुसार कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱयांची होती. त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे पवार यांना कोणत्याही गैरव्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही, असे शपथपत्रात एसीबीने म्हटले आहे.

अमरावती विभागाच्या विशेष तपास पथकाने जिगाव व इतर सहा सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारांमध्ये पवार यांची भूमिका तपासून पाहिली. त्यांना प्रश्नावली देण्यात आली होती त्यावर पवार यांनी दिलेली उत्तरे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस ऍण्ड इन्स्ट्रक्शन्समधील नियम व अन्य विविध पुरावे लक्षात घेता पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकत नसल्याचे एसीबीने म्हटले आहे.

सचिवांनी चुका निदर्शनास आणायला हव्या होत्या
जल संसाधन विभागाचे मंत्री विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे पदशिस्त अध्यक्ष असतात. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंट रुल्स ऑफ बिझनेस ऍण्ड इन्स्ट्रक्शन्सनुसार जलसंसाधन विभागाचे सचिवांनी तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कायद्यानुसार, महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी सिंचन प्रकल्पांचे टेंडर, खर्च मंजुरी इत्यादीमधील कायदेशीर बाबी तपासणे आवश्यक होते. त्यातील चुका त्यांनी जल संसाधन मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होते. तसे केल्याचे पुरावे रेकॉर्डवर नाहीत. अधिकाऱयांच्या या कृतीसाठी अजित पवार यांना जबाबदार धरता येणार नाही, असे एसीबीच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या