सहा चेंडूत सहा षटकार; ‘या’ खेळाडूने केला विश्वविक्रम

टी-20 क्रिकेट म्हंटल की षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आलीच. मात्र सहा चेंडूंमध्ये सहा षटकार बघण्याच भाग्य म्हणजे चाहत्यांसाठी मेजवाणीच. 2007 च्या टी20 विश्वचषकामध्ये फ्लिंटॉपने युवराजची खोड काढली आणि त्याच्या प्रतिउत्तरात युवराजने सहा चेडूंवर सहा जोरदार षटकार खेचले. युवराज सिंगने ब्रॉडला ठोकलेले सहा षटकार आजही क्रिडा प्रेमींच्या स्मरणात आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी 2021मध्ये श्रीलंकेविरुद्ध किरॉन पोलार्डच्या बॅटमधून सहा षटकारांचा पाऊस पडला होता. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त इतर कोणाला तशी किमया आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये साधता आली नव्हती. मात्र आता या लिस्टमध्ये नेपाळच्या दिपेंद्र सिंग एरी याचे नाव समाविष्ट झाले आहे.

ACC Men’s Premier Cup स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील नेपाळ विरुद्ध कतार या सातव्या सामन्यात नेपाळच्या दिपेंद्र सिंग एरीने सहा चेंडूंमध्ये सहा षटकार ठोकले आहेत. दिपेंद्रने 21 चेंडूंत 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. दिपेंद्रने डावाच्या शेवटच्या म्हणजे 20व्या षटकात सलग 6 षटकार खेचून इतिहास रचला. दिपेंद्रच्या खेळीमुळे नेपाळने 7 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावांचा डोंगर कतार समोर उभा केला.

युवराज सिंग, किरॉन पोलार्ड यांच्या नंतर दिपेंद्र सिंग एरी हा तिसरा असा फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सहा चेंडूंमध्ये सहा षटकार खेचले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये दोन अर्धशतकं 300 हून अधिकच्या स्ट्राईक रेटने करणारा दिपेंद्र जगातला पहिला फलंदाज ठरला.