
2023 च्या सुरुवातीला अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अॅसेंचर (Accenture) कंपनीने गुरुवारी आपल्या वर्षिक आर्थिक उत्पन्न आणि नफ्याचा अंदाज व्यक्त करताना तो अपेक्षेपेक्षा कमी असेल असं म्हणत कंपनीने एकूण 19 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याची घोषणा केली आहे.
अॅसेंचर कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येपैकी 2.5 टक्के म्हणजे तब्बल 19 हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, कंपनीतील नोकरकपात टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे. ही पुढील दीड वर्षात पूर्ण होईल. तर, जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे काळे ढग साचलेले असताना जगभरातील अनेक लहान-मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारी कपातीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. तसेच टेक्नोलॉजी बजेटच्या कपातीमुळे अॅसेंचर कंपनीनं हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय कंपनीने त्यांच्या वार्षिक महसूल आणि नफ्यासंदर्भात जाहीर केलेले अंदाज देखील कमी केले आहेत.
Consulting firm Accenture says to cut 19,000 jobs, reports AFP
— ANI (@ANI) March 24, 2023
कंपनीकडून पत्रक जारी
अॅसेंचर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, निर्धारित अंदाजापेक्षा कमी वार्षिक महसूल मिळाल्यामुळं यापूर्वीच कंपनीने नोकर कपात होणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता कंपनीनं थेट एक पत्रक जारी करत नोकरकपातीची घोषणा केली आहे. कंपनीचं म्हटलं आहे की, लोकल करन्सीमध्ये वार्षिक महसुलात 8 ते 10 टक्के वाढ होईल. यापूर्वी हाच आकडा कंपनीने 8 ते 11 टक्क्यांदरम्यान राहील अशी शक्यता व्यक्त केली होती. 2023 या आर्थिक वर्षात 16.01 ते 16.07 अब्ज डॉलर्स इतका महसूल कंपनीला मिळेल, असंही अॅक्सेंचर कंपनीनं म्हटलं आहे.