
उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर एक मोठे झाड कोसळले. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. झाड पडण्याच्या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. पोलीस-प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.
एका स्थानिकांने बसमध्ये अडकलेल्या एका महिला प्रवाशाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यावर ती संतापून म्हणाली, येथे जीवन-मरणाचा प्रश्न आहे आणि तुम्ही व्हिडिओ बनवत आहात, जर तुम्ही येऊन झाडाची फांदी काढण्यास मदत केली असती तर आम्ही बाहेर पडलो असतो.’ त्यानंतर जमावाने बचावकार्यात मदत केली. बाराबंकी-हैदरगड रस्त्यावरील हरख राजा बाजारजवळ हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस येथून जात असताना झाड त्यावर कोसळले. यानंतर, घटनास्थळी खूप आरडाओरडा झाला. लोक जीव वाचवण्यासाठी बसच्या खिडकीतून उड्या मारताना दिसले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सीएमओने सध्या पाच जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
या भयानक अपघातात चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाले आहेत. झाडे तोडून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात वेळ लागला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बस बाराबंकीहून हैदरगडला जात होती. अपघातात चालकासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे. झाड पडण्याच्या घटनेत अनेक बस प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.