
बीडमधील पाटोदाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मागून भरधाव आलेली जीप आदळली. या भीषण अपघातात जीपमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी झालेल्या दोघांचा बीड जिल्हा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले असून त्यात तीन वर्षांची मुलगीही आहे. तिला बीडच्या जिल्हा रूग्णालयातून संभाजीनगरला हलवण्यात आले आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील वैजाळा फाट्यावर सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात मृत्यू झालेले बीड तालुक्यातील निवडुंगवाडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
केशरबाई बन्सी मुंडे (55), वैजनाथ ज्ञानोबा तांदळे (45), बाळू पंढरी मुंडे (45), अशोक गबरू मुंडे (30), आसराबाई भीमराव मुंडे (60), सोहम सतीष मुंडे (06), शरद बन्सी मुंडे (35), स्वाती सतीष मुंडे (28) अशी मृतांची नावे आहेत. तर सतीष भीमराव मुंडे (40) आणि सई सतिष मुंडे (03) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून सई ही सतीष मुंडे यांची मुलगी असल्याचे सांगण्यात आले. तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले. घटनास्थळी पाटोदा पोलिसांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जिल्हा रूग्णालयातही शहर ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते.
सोमवारी सकाळी निवडुंगवाडी येथील प्रवासी जीपने पाटोदाकडे जात होते. वैद्यकिन्ही फाट्यावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जीपने जोराची धडक दिली. या अपघातात जीपमधील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांचे मृतदेह पाटोदा ग्रामीण रूग्णालयात तर दोघांचे मृतदेह जिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकला जीप धडकताच जीपच्या समोरील बाजुचा चुराडा झाला. ट्रकचा मागचा भाग जीपमध्ये घुसल्याने गंभीर मार लागून जीपमधील लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे निवडुंगवाडी आणि तांदळवाडी या दोन गावांवर शोककळा पसरली आहे.






























































