कफपरेड येथे भरधाव कारने तिघांना चिरडले; पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, दोनजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरधाव कारने उडविल्याने तीन जण गंभीर जखमी होऊन त्यात एका पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. तर दोन बँक अधिकारी गंभीर जखमी झाल्याची घटना कफपरेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणात आरोपी कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या गेट क्रमांक 6 जवळ एका बेफाम कारचालकाने तीन जणांना चिरडल्याची घटना दुपारी घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ लिपिक असलेले प्रसेनजीत गौतम धाडसे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात असिस्टंट जनरल मॅनेजर असलेले नितेश कुमार मंडल आणि एसबीआय कॅपिटलचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट सुजय कुमार विश्वास हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबई रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी 1.50 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या अपघातातील कारचा ड्रायव्हर मुकेश प्रदीप सिंह याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात बेदरकारपणे गाडी चालवून मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.