
सामना प्रतिनिधी । कर्जत
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते मदुराई एक्सप्रेस या गाडीचा खंडाळा घाटात अपघात झाला असून खंडाळा रेल्वे स्टेशनजवळ एक्सप्रेसच्या बँकरची जोरात धडक डब्याला बसल्याने हा अपघात झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नसले तरी डब्याचे मोठे नुकसान होऊन अप लाईनवरील वाहतुक विस्कळीत झाली. पुण्यावरून मुंबईकडे येणाऱ्या अनेक गाड्या रद्द झाल्याने सकाळी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले असुन दुपारी उशीरा वाहतुक धिम्म्या गतीने सुरु झाली आहे.
रात्री १२.१५ मिनीटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणारी ११०४३ मदुराई एक्सप्रेस कर्जत स्टेशनला पोचण्याचा टाईम रात्री १.४५ चा आहे मात्र हि गाडी काल दहा ते पंधरा मिनिट उशिराने कर्जत स्टेशन वर पोचली होती. कर्जतला प्रत्येक मेल एक्सप्रेसला गाडीच्या मागे दोन इंजिने अधिकची लावली जातात. कारण कर्जत सोडले की पुढे खंडाळा घाट सुरु होत असल्याने घाटामध्ये ही इंजिने गाडीला मागून ढकलत असतात. अशाच प्रकारे मदुराई एक्सप्रेसलाही नेहमीप्रमाणे दोन इंजिन जोडली गेली आणि मदुराई एक्सप्रेसने कर्जत स्टेशन सोडून लोणावळाच्या दिशेने प्रयाण केले. लोणावळा पोहचण्याचा टाइम हा रात्री २.३५ चा आहे. मात्र गाडी आधीच दहा ते पंधरा मिनिट लेट असल्याने रात्री २.५०च्या सुमारास मुंबई पासून १२३/२२ किलोमीटर जवळ खंडाळा स्टेशनवर आली असताना मागील इंजिनाने नेहमीपेक्षा थोडं जास्त दबावाने गाडीला पुढच्या दिशेने ढकलल्याने इंजिनचा पुढील डब्बा मागचा दाब आणि पुढचा दाब सहन न झाल्याने दाबला जाऊन रेल्वे लाईन वरून खाली घसरला. सुदैवाने या अपघातात कोणतंही जीवितहानी तसेच जखमी झाले नाही.
या अपघाताची माहिती मिळताच कर्जत आणि लोणावळावरून रेल्वे प्रशासनाचे पीडब्लूडी, ओएचइ तसेच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. अपघातग्रस्त डबा जागेवर ठेवून उर्वरित गाडी सकाळी ६.३० च्या सुमारास पुढे रवाना करण्यात आली. अपघातग्रस्त डबा बाजूला काढण्यासाठी मोठ्या क्रेनची आवश्यकता असल्याने ती कुर्ल्यावरून घटनास्थळी सकाळी ११.२० ला पोहोचली. त्यानंतर रेल्वे ट्रॅक वरून बाजूला काढण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे पुणे वरून मुंबई कडे जाणाऱ्या पुणे- मुंबई सिहगड एक्सप्रेस, पुणे – मुंबई प्रगती एक्सप्रेस, पुणे -कर्जत व कर्जत पुणे शटल, पुणे- मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. डेक्कन क्वीन व इतर गाड्या येऊ शकतात तर मग बाकीच्या गाड्या का नाही. एकाचवेळी एवढ्या महत्वाच्या गाड्या रद्द केल्याने ज्या गाड्या चालू आहेत त्यांना तरी महत्वाच्या स्थानकांवर थांबा द्यायला हवा होता, अशी मागणी कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी केली होती. मात्र रल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
































































